VIDEO : संघाने दिला संपुर्ण काश्मीरचा नारा

By admin | Published: October 11, 2016 10:26 AM2016-10-11T10:26:50+5:302016-10-11T21:36:45+5:30

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत सरसंघचालक मोहन भागवतांनी पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन केले.

VIDEO: Sangam gave all the Kashmiri slogan | VIDEO : संघाने दिला संपुर्ण काश्मीरचा नारा

VIDEO : संघाने दिला संपुर्ण काश्मीरचा नारा

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ११ - 'उरी' येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी लष्कराने गेल्या महिन्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ' सर्जिकल स्ट्राईक' करत ३८ जणांचा खात्मा केला. लष्कराच्या या कारवाईचे कुठे कौतुक होत आहे तर कोणी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सर्व पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. ' केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली लष्करानं जे काम करून दाखवलं ते अभिनंदनीय आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतोय' अशा शब्दांत कौतुक करत भागवतांनी पंतप्रधानांची पाठ थोपटली. 
विजयादशमीच्या मुहुर्तावर नागूपरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन पार पडले. 
 
‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्द्यावरुन काश्मीर प्रश्न आणखी तापला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखंड काश्मीरचा नारा दिला आहे. संघाच्या शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्या दरम्यान मोहन भागवत यांनी मीरपूर, मुजफ्फराबाद, गिलगिट, बाल्टिस्तानसह या पाकव्याप्त काश्मीरमधील भागांसह संपूर्ण काश्मीरवर भारताचाच अधिकार असल्याचे ठणकावून सांगितले.  मोदी सरकार व सैन्याला शाबासकी देत संपूर्ण काश्मीरच्या भुमिकेवर केंद्र सरकारने आक्रमक भुमिका कायम ठेवावी, असे प्रतिपादनदेखील त्यांनी यावेळी केले. संघाच्या नव्या गणवेशातील हा पहिलाच विजयादशमी उत्सव होता हे विशेष.
 
केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली लष्करान जे काम करून दाखवलं ते अभिनंदनीय आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतोय. भारतीय जवानांनी पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरामुळे जगाच्या पाठीवर भारताची मान उंचावली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कूटनितीमुळे पाकिस्तानला एकटे पाडण्यात यश आले आहे, अशा शब्दांत कौतुक करत सरसंघचालकांनी पंतप्रधानांची पाठ थोपटली.  सीमेपलिकडून काश्मिरातील जनतेला फूस लावण्याचे काम केले जाते हे सर्वांनाच माहिती आहे. असे होऊ नये यासाठी तेथे विजयाबरोबरच विश्वासाचेही वातावरण निर्माण करावे लागेल, असे ते म्हणाले.आजचे केंद्रातील व राज्यातील सरकार काम करणार आहे, उदासीन नाही. अजून बरचं काम होण बाकी आहे, पण सध्या जे काम सुरू आहे ते पाहून देश खूप पुढे जाईल असा विश्वास जनतेला वाटतो, असे भागवत म्हणाले.
 
 
सरसंघचालकांच्या भाषणाअगोदर शस्त्रपूजन करण्यात आले. शिवाय प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले तसेच निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पश्चिम क्षेत्र संघचालक जयंत भाई भाडेसिया, विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर संघचालक दिलीप लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संघाच्या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण करण्यात आले.
 
देशद्रोही शक्तींना उखडून टाका
यावेळी डॉ.भागवत यांनी सीमा भागात कार्यरत असलेल्या विविध दहशतवादी गटांना संपविण्याससंदर्भात भाष्य केले. देशातील संरक्षण दलाला सीमेवर आणखी दक्ष रहावे लागणार आहे. थोडीशी चूकदेखील महागात पडू शकते. ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या वेळी दाखविलेले दृढतेचे धोरण कायम राहिले पाहिजे. सीमा भागात कार्यरत असलेल्या देशद्रोही शक्तींना मूळापासून उखडून टाकावे लागेल. यासाठी केंद्र व राज्य यांच्यात प्रभावी समन्वय असणे आवश्यक आहे, असा सल्ला सरसंघचालकांनी दिला. 
 
विरोधकांवर हल्लाबोल
‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्यावरुन तसेच वर्षभरातील विविध वादांदरम्यान विरोधी पक्षांनी घेतलेल्या भुमिकेवर सरसंघचालकांनी जोरदार टीका केली. विरोधी पक्षांमुळे लोकशाही मजबूत होते.  भारताला पुढे जाऊ न देणाºया शक्ती घुसखोरी करत असून देशातल्या काही लोकांमुळे त्यांना खतपाणी मिळत आहे. देशातील काही लोक प्रत्येक गोष्टीचे भांडवल करत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. काही लहान गोष्टींना अवास्तव मोठे रुप देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.  देशाच्या हितासमोर पक्षीय राजकारणाला महत्त्व देणे योग्य नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
 
जातीय भेदभावावर टीका
२१ व्या शतकात असूनदेखील देशात होत असलेल्या जातीय भेदभावाच्या घटनांवर सरसंघचालकांनी टीका केली. देशात सामाजिक समरसतेसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. मात्र लहानशा गोष्टीमुळे उत्तेजित होऊन आपल्या श्रेष्ठतेच्या अहंकारात समाजातील निरपराध बांधवांवर अत्याचार करणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 
गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत रहावे
गोरक्षेच्या मुद्यावरुन देशात मोठा वाद निर्माण झाला होता. गोरक्षा व्हायलाच हवी. मात्र गोरक्षेच्या मुद्द्यावरुन लहानशा मुद्द्याला हवा देऊन अकारण वाद निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे आवश्यक आहे. उत्तेजित होऊन काम करू नये. गोहत्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले. 
 
शिक्षणप्रणाली स्वस्त व्हावी
शिक्षणप्रणालीच्या बाजारीकरणाबाबत डॉ.भागवत यांनी चिंता व्यक्त केली. देशातील शिक्षणप्रणालीत बदल अपेक्षित आहेत. स्वाभिमान, आत्मविश्वास वाढवणारी प्रणाली हवी. शिक्षणप्रणाली स्वतंत्रच रहायला पाहिजे. परंतु त्याचे बाजारीकरण होऊ नये यासाठी त्यात शासनाचा सहभाग हवी. शिक्षण सर्वांना सुलभपणे उपलब्ध झाले पाहिजे. सर्वांना शिक्षण स्वस्त मिळावे, यासाठी शासनाचा पुढाकार हवा, अशी सूचना सरसंघचालकांनी केली.
 
उत्सवांतील धांगडधिग्यांवर ठेवले बोट
समाजप्रबोधन व्हावे व संस्कारांची मूल्ये रुजावीत यासाठी देशात विविध उत्सव साजरे केले जातात. उत्सवांमध्ये ‘डीजे’ वाजविणे व ‘डेकोरेशन’ करणे यामुळे समाजप्रबोधन होत नाही. विधायक उपक्रम राबविले गेले पाहिजेत. महाराष्ट्रात गणेशोत्सवादरम्यान, अनेक मंडळ लोकहिताचे उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विस्थापित हिंदूना समान अधिकार हवा
देशात समान अधिकार कायदा लागू करावा, ही संघाची जुनी मागणी आहे. सरसंघचालकांनी त्याचाच पुनरोच्चार केला. काश्मीरमध्ये विस्थापित हिंदूंना अद्यापही अधिकार मिळालेले नाहीत. स्वातंत्र्यापासून काश्मीरचे नागरिक असूनदेखील त्यांच्याबाबत भेदभाव करण्यात येत आहे. याला संपविण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन डॉ.भागवत यांनी केले.
 
मुख्यमंत्री, गडकरी संघ गणवेशात
विजयादशमी उत्सवाला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी हे संघाच्या नवीन गणवेशात उपस्थित झाले होते. दोघेही मंत्री म्हणून नव्हे तर स्वयंसेवक म्हणून आले होते. याशिवाय राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपुरातील भाजपाचे सर्व आमदार, खा.मनोज तिवारी, खा.अजय संचेती, खा.विकास महात्मे, गायिका अनुराधा पौडवाल, विदेशातून आलेले स्वामी ब्रम्हदेव, स्वामी आनंदगिरी, डॉ.टोनी, राजा लुईस हे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नवीन गणवेशाबाबत उत्साह
संघाच्या नवीन गणवेशातील हा पहिलाच विजयादशमी उत्सव होता. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत पहिल्यांदाच ‘फुलपॅन्ट’मध्ये दिसले. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ज्येष्ठ स्वयंसेवकांपासून ते अगदी बाल स्वयंसेवकांपर्यंत हजारो जण नवीन गणवेशात होते. सरसंघचालकांनीदेखील या गणवेशाकडे सर्वांचे लक्ष असल्याचे भाष्य केले.
 
 
 

Web Title: VIDEO: Sangam gave all the Kashmiri slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.