VIDEO : जिल्हा परिषदेच्या परिसरात भरली वारल्याची शाळा!
By Admin | Published: August 26, 2016 02:30 PM2016-08-26T14:30:16+5:302016-08-26T16:07:58+5:30
रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष करणा-या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी चक्क जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २६ - इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या २०७ विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता केवळ ५ शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तथापि, रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष करणा-या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी चक्क जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थ्यांची शाळा २६ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान भरविण्यात आली. यासंदर्भात तालुक्यातील वारला येथील पालकांनी प्रशासनाला अवगत सुध्दा केले होते मात्र त्याची दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले.
यासंदर्भात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि संतप्त ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाºयांची भेट घेवून यासंदर्भात गत आठ दिवसापूर्वी चर्चा घडवून आणली. वारला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्यानुसार, सद्य:स्थितीत एकंदरित २०७ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. असे असताना ८ शिक्षकांच्या मंजूर ८ पदांपैकी गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेवर केवळ ५ शिक्षक कार्यरत असून ३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या महत्वाच्या तथा गंभीर प्रश्नासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती, जिल्हाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदिंना वेळोवेळी अवगत केले. मात्र, त्याचा कुठलाच फायदा झाला झाला नसल्याने पालकांनी आपले विद्यार्थी जिल्हा परिषद आवारात आणून तेथेच शाळा भरविली.