VIDEO : पुण्यात स्कूल व्हॅनने घेतला पेट, विद्यार्थी थोडक्यात बचावले
By admin | Published: October 6, 2016 03:42 PM2016-10-06T15:42:09+5:302016-10-06T15:45:37+5:30
शाळेच्या मुलांना घरी सोडण्यासाठी जात असलेल्या स्कूल व्हॅनला अचानक आग लागल्याची दुर्घटना पुण्यात घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ६ - शाळेच्या मुलांना घरी सोडण्यासाठी जात असलेल्या स्कूल व्हॅनला अचानक आग लागली. या घटनेत स्कूल व्हॅन संपुर्णपणे जळून खाक झाली. चालक आणि नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान राखत गाडीमधील दहा मुलांना बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग विझवली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश खरकुडे हे त्यांची स्कूल व्हॅन घेऊन सकाळी साडेअकराच्या सुमारास खासगी शाळेतील मुलांना घरी सोडण्यासाठी जात होते. एरंडवण्याजवळील पटवर्धन बाग परिसरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ गाडीमधून अचानक धुर येऊ लागला. त्यांनी गाडी बाजुला उभी करताच गाडीने पेट घेतला. स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला धावले. खरकुडे आणि नागरिकांनी तातडीने गाडीतील 10 मुलांना विद्युत चपळाईने खाली उतरवत दुरवर नेले. काही क्षणातच गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला. बघता बघता गाडी जळून खाक झाली. खरकुडे यांचा मोबाईलही या आगीत जळाला.
दरम्यान, नागरिकांनी अग्निशामक दलाला फोन करुन आगीची माहिती दिली. माहिती मिळताच दलाचे तांडेल राजेंद्र पायगुडे, चालक सतिश जगताप, जवान राजेंद्र भिलारे, महेश देशमुख, विठ्ठल सावंत घटनास्थळी धावले. पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवले. मुलांना दुस-या वाहनामधून त्यांच्या घरी पाठवण्यात आले असून सर्व मुले सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेच्या निमित्ताने स्कूल व्हॅन्सच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.