VIDEO - सामान्यांना समजेल अशा भाषेत विज्ञान लेखन व्हावे - चंद्रशेखर कुलकर्णी

By Admin | Published: February 4, 2017 05:34 PM2017-02-04T17:34:40+5:302017-02-04T17:34:40+5:30

ऑनलाइन लोकमत  जळगाव, दि. 4 - विज्ञान आणि समाज यांचे संबंध सशक्त होण्यासाठी विज्ञान लेखकांची संख्या वाढली पाहिजे आहे. ...

VIDEO - Science should be written in a language that people can understand - Chandrasekhar Kulkarni | VIDEO - सामान्यांना समजेल अशा भाषेत विज्ञान लेखन व्हावे - चंद्रशेखर कुलकर्णी

VIDEO - सामान्यांना समजेल अशा भाषेत विज्ञान लेखन व्हावे - चंद्रशेखर कुलकर्णी

Next

ऑनलाइन लोकमत 
जळगाव, दि. 4 - विज्ञान आणि समाज यांचे संबंध सशक्त होण्यासाठी विज्ञान लेखकांची संख्या वाढली पाहिजे आहे. आपल्याकडे इतर ग्रंथसंपदा अफाट असतानाही विज्ञान लेखन विपुल प्रमाणात का नाही, याचा विचार अशा संमेलनांमधून जरूर व्हायला हवा, अशी अपेक्षा तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद, मराठी विज्ञान परिषद जळगाव शाखा यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित दोन दिवसीय तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनास ४ फेब्रुवारी रोजी नूतन मराठा महाविद्यालयात थाटात प्रारंभ झाला, त्यावेळी उदघाटन सत्रादरम्यान अध्यक्षीय भाषणातून कुलकर्णी यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ.पां.देशपांडे, जळगाव शाखेचे कार्यवाह दीपक तांबोळी, जळगाव शाखेचे उपाध्यक्ष प्रा. एस.व्ही. सोमवंशी, डॉ. विवेक पाटकर उपस्थित होते. 
सकाळी डॉ. जगदीशचंद्र बोस सभागृहात प्राचार्य डॉ. देशमुख यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन व अज्ञानाचे कुलूप विज्ञानाच्या चावीने उघडून संमेलनाचे उदघाटन झाले. प्रा. एस.व्ही. सोमवंशी यांनी स्वागतपर भाषणात परिषदेच्या कार्याचा धावता आढावा घेतला. त्यानंतर अ.पां. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. 

विज्ञान लेखनातून दरी कमी व्हावी
चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले की, वैज्ञानिक संशोधन होताना ते समाजाला समजेल अशा भाषेत मांडले जात नाही. त्यामुळे या संशोधनाचा समाजाशी काय संबंध आहे, हा विचार करून सामान्यांना समजेल अशा भाषेत विज्ञान लेखन व्हावे व या लेखनातून प्रतिभासंपन्न व सामान्यातील दरी कमी व्हावी. संशोधन करताना वैज्ञानिकांची एक परिभाषा आहे. मात्र वैज्ञानिकांची ही परिभाषा सामान्यांपर्यंत पोहचणे हे मापदंड आहे. त्यामुळे त्यांची परिभाषा सोप्या भाषेत असावी.

संस्कृतीचे स्मरण करून जबाबदारी स्वीकारली

संमेलनाध्यक्षकुलकर्णीम्हणाले,‘कुतूहल’ हा माझा पेशा असल्याने त्याच पायावर बेतलेल्या विज्ञानाशी ही अशी नाळ जोडली गेली असावी व या संमेलनाचे मला अध्यक्षपद मिळाले असे मी समजतो, असे चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सांगून ज्या पूर्वसुरींकडून अध्यक्षपदाची वस्त्रे माझ्याकडे आली, त्यांची गादी मी चालवू पाहणे हास्यास्पद ठरेल. पण ‘आसन महिमा मोठा असतो...’ यावर श्रद्धा असलेल्या आपल्या संस्कृतीचे स्मरण करून ही जबाबदारी मी स्वीकारली आहे.

...तेव्हा विज्ञानाची कलाकृती साकारते
विज्ञान भावनांवर चालत नाही. श्रद्धा, सहिष्णुता, भाबडेपणा हे ज्याला वर्ज्य आहे, अशा विज्ञानाच्या बाबतीतील भूतकाळ, वर्तमानकाळ आणि हे विज्ञान मानवी संस्कृतीला कोठवर नेणार आहे याचा भविष्यवेधी आडाखा जनसामान्यांच्या पुढ्यात मांडण्याचे काम विज्ञान लेखकांनी मराठीत सुरू केलेही आहे. अर्थात या स्वरूपाच्या लेखनाला प्रतिभेच्या स्वप्नांचे धुमारे फुटत असले तरी ही काही कविता नव्हे. वास्तवाचे भान ही या लेखनाची पूर्वअट ठरते, असे मत कुलकर्णी यांनी यावेळी मांडले. वस्तुस्थिती प्रतिभेची मागणी करते तेव्हा त्यातून विज्ञान लेखनाची कलाकृती साकारते, असाही उल्लेखसंमेलननाध्यक्षांनीकेला. 

मराठी इतकीही दुर्बल नाही...
विज्ञानाची काही परिभाषा आहे. ती मराठीत आणणे काहीसे क्लिष्टही आहे. पण ते अशक्य वाटण्याइतपत मराठी दुर्बलही नाही, असे कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून सांगितले. अगदी सावरकरांसारखा भाषाशुद्धीचा विचार समजा नाही केला, तरी ‘वावडे’ यासारख्या सोप्या शब्दप्रयोगांची मराठी विज्ञान लेखनाला अ‍ॅलर्जी असण्याचे कारण नाही! शब्दखेळ हा वास्तवापेक्षा प्रभावी असता कामा नये, याचे भान असलेल्यांच्या हातून स्वाभाविकपणे कसदार विज्ञान लेखन झाले असल्याचे सांगून त्यांनी या संदर्भात डॉ. जयंत नारळीकरांपासून डॉ. अनिल काकोडकरांपर्यंत आणि डॉ. बाळ फोंडके यांच्यापासून लक्ष्मण लोंढे यांच्यापर्यंत अनेक नावे घेता येतील, असे ते म्हणाले. 

विज्ञान लेखकांना माध्यमात जागा व प्रतिष्ठा नाही
शब्दविज्ञान अर्थात विज्ञान लेखन अधिक सशक्त करण्याच्या कामी माध्यमांची भूमिका निदान आजवर स्पृहणीय राहिलेली नाही, असे स्पष्ट मत मांडून ही स्थिती बदलेल, असा आशावादही संमेलनाध्यक्षांनी व्यक्त केला. विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेली प्रगती, त्याचे समाजावर होऊ घातलेले परिणाम यांची चिकित्सा करणे हा खरेतर माध्यमांच्या कर्तव्याचा भाग आहे. पण आम्हीही हे सारे लोकांना समजावून सांगण्याची क्षमता असलेल्या विज्ञान लेखकांना जागा आणि प्रतिष्ठा देत नसल्याचेही संमेलनाध्यक्ष म्हणाले. 

मराठीत विज्ञान साहित्य लिहिण्यास वाव
विज्ञानाविषयी इंग्रजीमध्ये मोठ्या प्रमाणात लिखान झालेले आहे. मात्र त्या प्रमाणात मराठी भाषेत झालेले नाही. त्यामुळे मराठीमध्ये विज्ञान साहित्य लिहिण्यास वाव असल्याचे प्रतिपादन उद््घाटक प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख यांनी केले. सोबतच विज्ञानामध्ये जास्तीत जास्त लिखान कसे होईल यासाठी प्रयत्न करू अशीही ग्वाही देशमुख यांनी दिली. 

पुस्तिकेचे प्रकाशन
नंदकिशोर शुक्ल यांनी लिहिलेल्या लोकशिक्षणाच्या प्रबोधनपर पुस्तिकेचे प्रकाशन चंद्रशेखर कुलकर्णी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विज्ञान विद्या शाखेची विद्यार्थिनी उज्ज्वला पाटील हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. 

गंमतीशीर व अभ्यासपूर्ण भाषणाने ठेवले खिळवून
संमेलनाध्यक्ष कुलकर्णी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले की, माझी पदवी विज्ञान शाखेची नाही की मी विज्ञान लेखकही नाही. तरी सुद्धा विज्ञान साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले ते माझ्या मनात विज्ञानाची अढी नसल्यामुळे. यात त्यांनी वडिलांचा आवर्जून उल्लेख करीत ते शास्त्रज्ञ असल्याचे सांगितले. त्यांच्या सव्वा तासाच्या अभ्यासपूर्ण व गंमतीशीर भाषणाने श्रोत्यांना खिळवून ठेवले.

स्वागताला ‘विज्ञानाची अनोखी फळे’
संमेलनस्थळी प्रवेश करताच दर्शनी भागात स्वागत होते ते विज्ञानाच्या अनोख्या फळांनी. या ठिकाणी केळीचे घड उभे करून त्यावर विज्ञान, तंत्रज्ञानाची फळे लागली असल्याचे दर्शविण्यात आले आहे. ‘विज्ञान साहित्याच्या पोटी फळे रसाळ गोमटी’ अशी संकल्पना येथे साकारण्यात आली आहे. 

विज्ञानमयवातावरण
संमेलनस्थळी तसेच सभागृहात लावण्यात आलेल्या विज्ञान साहित्य संमेलनाच्या फलक, बॅनरवर दिवे, विविध वैज्ञानिक उपकरणे दाखवून वातावरण विज्ञानमय करण्यात आले. 

आज संमेलनात....
५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विज्ञान लेखन चर्चासत्र होईल. त्याच्या अध्यक्षस्थानी अ.पां. देशपांडे (मुंबई) हे राहणार असून यामध्ये प्रा.राजाभाऊ ढेपे (सोलापूर), प्रा.मोहन मद्वाण्णा (सांगली), डॉ.विवेक पाटकर (मुंबई) हे सहभागी होतील. दुपारी १२ ते १ - विज्ञान फिल्मस्, पोस्टर्स, दुपारी २ ते ४ विज्ञान कविता चर्चासत्र होणार असून अध्यक्षस्थानी प्रा.शिरीष गोपाळ देशपांडे (मुंबई) हे राहणार आहे. प्रा.मोना चिमोटे (अमरावती), प्रा.यशवंत देशपांडे (औरंगाबाद) हे सहभागी होतील. दुपारी ४.३० वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे. अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषदेचे जळगाव विभाग अध्यक्ष भालचंद्र पाटील राहणार आहेत. समारोपप्रसंगी संमेलनाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ.पां.देशपांडे, दीपक तांबोळी यांची उपस्थिती राहणार आहेत.

व्यंगचित्रकार ताणतणाव कमी करतो
प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव नेहमी येतच असतो. हा ताणतणाव कमी करण्याचे काम व्यंगचित्रकार करत असतो. म्हणूनच व्यंगचित्रकार हा मनोवैज्ञानिक असतो, असे मत मुंबईतील विज्ञान व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांनी व्यक्त केले. विज्ञान साहित्य संमेलनामध्ये विज्ञान व्यंगचित्रे या दुसऱ्या सत्राप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, व्यंगचित्रकार हा नेहमी आपल्या चित्रातून नागरीकांना हसविण्याचे काम करत असतो. व्यंगचित्रे ही उखाणे व म्हणी यामधूनच सूचत असतात, असेही मिस्त्री यांनी स्पष्ट केले. 
मनोरंजनात्मक चित्रांचे दर्शन
व्यंगचित्राविषयी माहिती देताना त्यांनी काही स्वत: काढलेले व्यंगचित्रे उपस्थितांना दाखविले. यात लठ्ठ महिला, पोलीस, एका छत्रीत चार माणसे यासारखी मनोरंजनात्मक चित्रे त्यांनी दाखविली. सोबतच काही म्हणींनुसार तयार केलेल्या व्यंगचित्रांचे स्पष्टीकरणदेखील त्यांनी उपस्थितांना दिले.

https://www.dailymotion.com/video/x844qdx

Web Title: VIDEO - Science should be written in a language that people can understand - Chandrasekhar Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.