VIDEO : ‘भावली’च्या शांत धबधब्यांची मोहिनी..!
By Admin | Published: July 16, 2017 02:44 AM2017-07-16T02:44:17+5:302017-07-16T05:05:56+5:30
- अझहर शेख/ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 16 - हिरवाईने नटलेली डोंगररांग... सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू... गर्द हिरवाईतून खळाळणारे ...
- अझहर शेख/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 16 - हिरवाईने नटलेली डोंगररांग... सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू... गर्द हिरवाईतून खळाळणारे धबधबे... थंड वारा अन् कोसळणा-या पाऊसधारा अशा निसर्गरम्य वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी नाशिककरांबरोबरच मुंबईकरांचीदेखील वीकेण्डला जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश असलेल्या इगतपूरी तालुक्यातील भावली धरणाच्या परिसरात गर्दी होत आहे. येथील गायवझरा, सुपवझरा या मोठ्या धबधब्यांसह अन्य लहान-मोठ्या धबधब्यांनी पर्यटकांना मोहिनी घातली आहे.
नाशिकपासून अवघ्या ४० ते ५० किलोमीटर अंतरावर असलेला भावलीचा परिसर आणि मुंबईपासून अवघ्या १२० किलोमीटरवर असलेल्या या परिसरात पर्यटकांची वर्दळ दिसून येत आहे. येथील धबधब्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत शांत स्वरुपात डोंगरकडांवरून कोसळणारे पाणी. या धबधब्यांची मोहिनी पडणे स्वभाविक आहे. कारण कु ठलाही रौद्रावतार पाण्याचा जाणवत नाही त्यामुळे पर्यटकांच्या मनामध्ये अन्या ठिकाणांच्या धबधब्याप्रमाणे भीतीही वाटत नाही. पर्यटक मनमुरादपणे अगदी धबधब्यांजवळ जाऊन तुषार अंगावर झेलत भिजण्याचा आनंद लुटताना दिसून येतात. हे ठिकाण दोन ते तीन वर्षांपुर्वी फारसे प्रसिद्ध नव्हते; मात्र महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विविध माहिती पत्रके, अनुभवा नाशिकचे चौफेर सौंदर्य अशा प्रकारच्या माहिती पुस्तिकांच्या माध्यमातून या पर्यटनस्थळाची प्रसिध्दी केल्यामुळे पर्यटकांचा कल आता वाढू लागला आहे. या ठिकाणी येणा-या पर्यटकांमध्ये तरुणाईची संख्या जास्त आहे.
निसर्गसौंदर्याला लागतोय ‘डाग’...
पर्यटकांनी निसर्गाचा मनमुरादपणे आनंद लुटताना त्याला कुठलाही प्रकारचा धक्का वर्तणूकीतून लावता कामा नये, अशी अपेक्षा आहे. जागरूक नागरिक म्हणून पर्यटकांनी भान ठेवून निसर्ग संवर्धनाचा विसर पडू देऊ नये. अगदी एखाद्या चित्रकाराने कुंचल्यातून कॅनव्हासवर साकारावे, असेच चित्र भासणारे येथील हिरवाईतून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या आवारात पाणी, मद्याच्या बाटल्या, फास्ट फूडचे रॅपर, कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या यांचा अक्षरक्ष: खच पडलेला दिसून येतो. महामार्गापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंप्री सदो गावाच्या शिवाराला लागून भावलीचा परिसर आहे. यामुळे ग्रामपंचायतीकडून केले जाणारे स्वच्छतेचे प्रयत्नही तोकडे पडणे सहाजिकच आहे. त्यामुळे पर्यटकांनी स्वयंशिस्त बाळगावी असे मत स्थानिक गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
https://www.dailymotion.com/video/x8458gs