VIDEO- एकच पर्व, बहुजन सर्व ! बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार
By Admin | Published: December 29, 2016 07:17 PM2016-12-29T19:17:03+5:302016-12-29T19:17:03+5:30
ऑनलाइन लोकमत बुलढाणा, दि. 29 - अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा, मुस्लीम समाजाला आरक्षण द्या, यासह बहुजन समाजाच्या विविध ...
ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. 29 - अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा, मुस्लीम समाजाला आरक्षण द्या, यासह बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक संघटनांच्या वतीने गुरुवारी येथे काढण्यात आलेल्या बहुजन क्रांती मोर्चाला प्रचंड प्रतिसाद लाभला. संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन समाजाच्या संविधानिक न्याय हक्कासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बुलडाणा येथे २९ डिसेंबर रोजी आयोजित मोर्चाला सकाळी १० वाजता स्थानिक जयस्तंभ चौक येथे प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाभिक समाज संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दामोदर बिडवे, चर्मकार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डी. आर. माळी, सदानंद माळी, बाबासाहेब जाधव, संयोजन समिती सदस्य तथा कामगार नेते अशोक दाभाडे, नितीन मोरे, अरिहंत पतसंस्थेचे अध्यक्ष जितेंद्र जैन, मुफ्ती अनिसउद्दीन, भटक्या विमुक्त संघटनेचे नेते समाधान गुऱ्हाळकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष वनिता गायकवाड, के. ओ. बाविस्कर, सतीश पवार, अॅड. गणेश इंगळे, अर्जुनदादा गवई, मधुकरराव गवई, बाबासाहेब जाधव, दिलीपदादा जाधव, धनगर समाज संघटनेचे नामोडे, लक्ष्मण घुमरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
बहुजन क्रांती मोर्चासाठी सकाळी ८ वाजतापासून जिल्ह्यातील गावागावातून नागरिक सहभागी होत होते. जयस्तंभ चौक परिसरात उभारण्यात आलेल्या मुख्य स्टेजजवळ सकाळपासून येणारे नागरिक गोळा होत होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शाहिरीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. अध्यक्षीय भाषणातून वामन मेश्राम यांनी बहूजन समाजाच्या विकासासाठी सर्व बहूजनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले, की बहूजन क्रांती मोर्चा काढल्यानंतर आपली लढाई संपणार नाही तर घरी गेल्यावर गावा- गावात बहूजन क्रांती मोर्चाच्या समित्या गठीत करा.
आतापर्यंत शासनाने बहूजनांच्या विकास करण्यासाठी विविध समित्या गठीत केल्या. मात्र, त्या समित्यांनीच आमचा विश्वासघात केल्या. त्यामुळे आमचा त्या समित्यांवर विश्वास नाही. आता आपणच गावागावात समित्या गठीत करून न्याय हक्कासाठी लढा द्या, असे आवाहन केले. यावेळी नितीन मोरे, श्रावण माळी, वनिता गायकवाड, हाफीज कुरेशी, जितेंद्र जैन, प्रा. डी. आर. माळी, अलीसुद्दीन, अशोक दाभाडे, दिलीप जाधव, समाधान कुऱ्हाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी संविधान प्रास्तविकेचे वाचन करण्यात आले. दीपक मोरे व अमोल खरे यांनी संविधान प्रास्तविकेचे वाचन केले. संचालन कुणाल पैठनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली ठाकरे यांनी केले.
महिलांचा सहभाग लक्षणीय
बहुजन क्रांती मोर्चाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. या मोर्चात संपूर्ण जिल्हाभरातून महिला आल्या होत्या. सकाळपासूनच लहान मुलांसह महिला मोर्चात सहभागी होण्याकरिता बुलडाण्यात दाखल झाल्या. महिलांसाठी बैठक व्यवस्था स्टेज समोर जयस्तंभ चौक परिसर समोरच्या बाजूला प्रथम महिलांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली.
पाणी वाटप व नास्त्याची व्यवस्था
मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील चिखली रोड, मोताळा रोडवर पाणी व नास्त्याची व्यवस्था करण्यात आली.