VIDEO - कडेगावात गगनचुंबी ताबुतांच्या भेटी
By Admin | Published: October 12, 2016 06:34 PM2016-10-12T18:34:29+5:302016-10-12T18:34:29+5:30
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिध्द असलेल्या कडेगाव येथील मोहरमच्या गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा अनोखा सोहळा बुधवारी दुपारी हजारोंच्या
ऑनलाइन लोकमत
कडेगाव (सांगली), दि. 12 - हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिध्द असलेल्या कडेगाव येथील मोहरमच्या गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा अनोखा सोहळा बुधवारी दुपारी हजारोंच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात पार पडला. ‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा... अब एकी का कर दो पुकारा’, ‘हिंदू-मुस्लिम एक रहेंगे... एकीसे सागर पार करेंगे’ अशा राष्ट्रीय ऐक्याच्या संदेशाने परिसर दुमदुमून गेला.
मोहरमनिमित्त कडेगावात सुमारे १५० ते २०० फूट उंच गगनचुंबी ताबुतांच्या भेटी होतात. हा सोहळा पाहण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील भाविक आले होते. सकाळी ९ वाजता शिवाजीनगर, निमसोड, सोहोली, कडेपूर येथील खांदेकरी, मानकऱ्यांना वाजत-गाजत ताबुताच्या ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर पूजा करून मानाचा सातभाई हा सर्वात उंच ताबूत सकाळी ११ वाजता प्रथम उचलण्यात आला
त्यानंतर हा ताबूत पाटील चौकात येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत १२ वाजता पाटील चौकात आले. त्यानंतर बागवान, आत्तार, शेटे यांचे ताबूत पाटील चौकात आले. हे ताबूत ओळीने मोहरम चौकात निघाले. त्यानंतर सातभाई-पाटील, सातभाई-बागवान, सातभाई-आत्तार, पटेल-बागवान या उंच ताबुतांच्या भेटी दुपारी १२ वाजता झाल्या. त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेशबाबा देशमुख पतसंस्थेजवळ आले. तेथे तांबोळी यांचा ताबूत येऊन मिळाला. दुपारी १ वाजता हे सर्व ताबूत सुरेशबाबा (मोहरम) चौकात पोहोचले. त्यानंतर इनामदार व सुतार यांचे उंच ताबूत आले. हिंदू मानकऱ्यांच्यावतीने मसुदमाला ताबूत पंजे, बारा इमामचे पंजे, नालसाहेब यांचे पंजे सुरेशबाबा चौकात आणण्यात आले. दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी ताबूत उचलण्यात आले व भेटीचा सोहळा सुरू झाला. दुपारी १ वाजून १० मिनिटानी सातभाई-आत्तार, पटेल-बागवान, सातभाई-पाटील, सातभाई-बागवान अशा ताबुतांच्या भेटी पार पडल्या.
या सोहळ्यासाठी माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, युवक नेते डॉ. जितेश कदम, प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे, तहसीलदार अर्चना शेटे, मुख्याधिकारी चरण कोल्हे आदी प्रमुख उपस्थित होते.