VIDEO : शोभायात्रेतून ‘डिजिटल इंडिया’चा नारा
By admin | Published: February 10, 2017 11:42 PM2017-02-10T23:42:31+5:302017-02-10T23:42:31+5:30
पारंपरिक वेशभूषेसह आपल्या राज्यातील वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरांचे दर्शन घडविणा-या कलाप्रकारांचे सादरीकरण, ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत, उत्साही वातावरणात शुक्रवारी
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 10 - पारंपरिक वेशभूषेसह आपल्या राज्यातील वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरांचे दर्शन घडविणा-या कलाप्रकारांचे सादरीकरण, ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत, उत्साही वातावरणात शुक्रवारी शोभायात्रेतून ‘शिवोत्सवा’स प्रारंभ झाला. यावेळी ‘कॅशलेस व्यवहार’ या विषयाभोवती गुंफलेल्या ‘शोभायात्रे’ने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
शोभायात्रेची सुरुवातप्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे यांच्या हस्ते ध्वज दाखवून झाली. यावेळी कु लसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आर. व्ही. गुरव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, एनएसएस विभागप्रमुख डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, ‘एआययू’चे सहसचिव डॉ. डेव्हिड सॅम्पसन, आदी उपस्थित होते.
महोत्सवासाठी देशभरातून आलेल्या विविध विद्यापीठांतील संघांनी दुपारी अडीच वाजल्यापासूनच शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ गटागटाने जमावयास सुरुवात केली होती. यावेळी श्री खंडोबा वेताळ तालीम मर्दानी खेळपथकाने शिवकालीन युद्धक लेचे दर्शन घडविले. तसेच सुहासराजे ठोंबरे यांनी पोवाड्यांचे सादरीकरण केले. शोभायात्रेच्या अग्रस्थानी विद्यापीठाचा ध्वज धारण करणारा अश्व आणि त्याच्यापाठोपाठ झांजपथक होते. त्यामागे शिवाजी विद्यापीठाचा कोल्हापूरची संस्कृती, कृषी व परंपरेचे दर्शन घडविणारा चित्ररथ होता. गतवर्र्षीच्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील विजेत्या बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या संघाला अग्रस्थानाचा मान देण्यात आला. त्यापाठोपाठ अन्य विद्यापीठांचे संघ आणि सर्वांत शेवटी यजमान शिवाजी विद्यापीठाचा संघ होता. यावेळी त्यांनी आपल्या संस्कृती, परंपरेसह विविध वाद्यांचे सादरीकरण केले. आसामच्या तेजपूर विद्यापीठाने आपल्या पर्यटन संस्कृतीचे दर्शन घडवीत पारंपरिकतेला कॅशलेस व्यवहाराची जोड देणारा देखावा सादर केला; तर जम्मू अॅँड काश्मीर विद्यापीठाने ‘नोटाबंदीतून नवा भारत घडेल,’ असा संदेश देणारी कलाकृती सादर केली. रांची विद्यापीठाने आपल्या वाद्य व नृत्यप्रकारांतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सीपीआर रुग्णालय यांच्यातर्फे एड्स जनजागृतीसाठी प्रबोधन करणारा चित्ररथही यामध्ये सहभागी झाला होता. तसेच यावेळी त्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. शोभायात्रेचा मार्ग विद्यापीठाची मुख्य इमारत, मुलींचे वसतिगृह, सायबर चौक, माउली चौक, चांदीचा गणपतीचे मंदिर (शाहूनगर), प्रतिभानगर, मालती अपार्टमेंट, एनसीसी भवन ते लोककला केंद्र असा राहिला. दुपारची वेळ असूनही शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. देशभरातून आलेल्या युवा कलाकारांच्या संघाकडे कुतूहलाने पाहून ते कौतुकाची दाद देत होते