VIDEO : वृद्धेला लुटणारा समोसा गजाआड
By Admin | Published: August 13, 2016 04:16 AM2016-08-13T04:16:50+5:302016-08-13T04:16:50+5:30
देवदर्शनाला निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळालेल्या समोसाला शीव पोलिसांनी तब्बल २० दिवसांनंतर बिहार येथून अटक केली. जावेद मोहम्मद समशाद खान उर्फ
मुंबई : देवदर्शनाला निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळालेल्या समोसाला शीव पोलिसांनी तब्बल २० दिवसांनंतर बिहार येथून अटक केली. जावेद मोहम्मद समशाद खान उर्फ समोसा (२२) असे या आरोपीचे नाव असून, विशेष म्हणजे पाठमोऱ्या व्हिडीओ फुटेजच्या आधारावर पोलिसांनी त्याचा शोध घेतला.
शीव येथील जैन सोसायटीत चंद्राबेन प्रवीण मेहता (७३) या कुटुंबीयांसोबत राहतात. २४ जुलै रोजी सकाळी ९ च्या सुमारास त्या मंदिराकडे निघाल्या. सोसायटीतूनच जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांवरही दबाव वाढला होता. यामध्ये त्यांची १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरीला गेली होती. शीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक येशुदास गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, अंमलदार सावंत, पाटील, सोनावणे यांच्या पथकाने तपास
केला.
व्हिडीओमध्ये लुटारू पाठमोरा दिसत होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, स्थानिकांची चौकशी केली. वृद्धेने केलेल्या वर्णनाच्या आधारे शोध घेतल्यानंतर तो समोसा असल्याचे समोर आले. गुप्त माहितीदारांच्या मदतीने तो धारावी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो बिहारला पळून गेला होता. गायकवाड यांचे तपास पथक बिहारला रवाना झाले. २०
दिवसांनी पोलिसांनी समोसाला अटक केली. तो अभिलेखावरील आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारचा रहिवासी असलेला समोसा हा धारावी येथे आई आणि चार भावांसोबत राहतो. नशेच्या आहारी गेलेल्या समोसाला घरातूनही पैसे मिळणे बंद झाले होते. त्यामुळे नशेसाठी तो सोनसाखळी चोरी करू लागला होता. त्याच्याविरुद्ध अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)