VIDEO: सोयाबीन खरेदीत एकाच दिवशी ६ कोटींची उलाढाल!
By admin | Published: October 25, 2016 06:49 PM2016-10-25T18:49:29+5:302016-10-25T18:49:29+5:30
- खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या विक्रमी खरेदीची नोंद सोमवारी घेण्यात आली आहे. एकाच दिवशी सोयाबीन खरेदी व्यवहारात तब्बल ६ कोटींची उलाढाल झाली
Next
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 25 - खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या विक्रमी खरेदीची नोंद सोमवारी घेण्यात आली आहे. एकाच दिवशी सोयाबीन खरेदी व्यवहारात तब्बल ६ कोटींची उलाढाल झाली असून दिवाळीनंतर खरेदीचा आलेख आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.
सतत तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाºया शेतकºयांना यावर्षी पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. खरिपातील सोयाबीनचे समाधानकारक उत्पन्न यावेळी दिसून येत आहे. पश्चिम विदर्भातील शेतकºयांनी गेल्या काही वर्षांपासून कपाशीचा पेरा कमी करीत सोयाबीनची पेरणी वाढविली आहे. मात्र गत तीन वर्षांपासून पेरणीचा खर्च देखील सोयाबीनच्या उत्पन्नात निघाला नाही. दरम्यान यावर्षी खरिपातील पिकांना पोषक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने तसेच जाणकारांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकºयांनी पुन्हा एकदा सोयाबीन पेरणीचा जुगार खेळला. दोन आठवड्यापासून सोयाबीनची काढणी सुरु असून दिवाळीनंतरही आठवडाभर सोयाबीनचे उत्पन्न शेतकºयांच्या घरात येणार आहे. तथापी बी-बियाण्यांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासोबतच सर्वात महत्वाचा दिवाळीसण तोंडावर आल्याने हजारो शेतकºयांना सोयाबीन विक्रीसाठी काढावे लागले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावात खरेदी होत नसतानाही शेतकरी सोयाबीनची विक्री करीत आहेत.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुलडाणा जिल्ह्यासह अकोला, वाशिम, जळगाव आदी जिल्ह्यांमधून सोयाबीन विक्रीकरिता येत आहे. २४ आॅक्टोबर रोजी २३ हजार ८४० क्विंटल सोयाबीनची खरेदी बाजार समितीत करण्यात आली असून या एकाच पिकाच्या खरेदीत तब्बल ६ कोटींची उलाढाल झाली आहे. सोयाबीनला सध्या २२५० रुपये पासून २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. दिवाळीनंतर सोयाबीनच्या भावात वाढ होण्याची शक्यता असल्याने सोयाबीन खरेदी-विक्री याहीपेक्षा मोठी उलाढाल होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.