VIDEO - पनवेलमध्ये पकडलेले तीन संशयित कंटेनर कंपनीचे कर्मचारी
By Admin | Published: September 24, 2016 04:30 PM2016-09-24T16:30:18+5:302016-09-24T18:07:25+5:30
पनवेल गव्हाणफाटा येथे अटक केलेले तीन संशयित कंटेनर कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.
भालचंद्र जुमलेदार, ऑनलाइन लोकमत
उरण, दि. २४ - पनवेल गव्हाणफाटा येथे अटक केलेले तीन संशयित कंटेनर कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी उरणमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी लष्करी गणवेशातील बंदुकधा-यांना पाहिल्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर या संशयितांकडे लष्करी गणवेश सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली.
अटक केलेले तिघे काश्मिरी नागरीक असून, ते आधी लष्करात होते. आता ते कंटेनर कंपनीत कामाला आहेत. लष्करात असल्यामुळे त्यांच्याकडे लष्करी गणवेश सापडला अशी माहिती पनवेल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बाजारे यांनी दिली.
तीन अज्ञात आरोपींना अटक करण्यात आली आहे. गव्हाणफाटा येथून एक कंटेनर पनवेलच्या दिशेने चालला होता. त्याचवेळी सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणारी बस उरण ओएनजीसीच्या दिशेने चालली होती.
त्यावेळी सीआयएसएफच्या जवानांना कंटेनर चालकावर संशय आला. सीआयएसएफच्या जवानांनी कंटेनर थांबवून झडती घेतली असता पाचजण लष्करी गणवेशात आढळले. त्यापैकी तिघांना अटक केली असून, दोघे जण निसटण्यात यशस्वी ठरले.
दोन दिवसांपूर्वी उरणमध्ये शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना पाच शस्त्रधारी तरुण दिसले होते. हे शस्त्रधारी अतिरेकी असल्याची दाट शक्यता असल्याने उरण, पनवेल, अलिबाग परिसरात त्यांचा युध्दपातळीवर शोध सुरु होता. पोलिसांनी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघा संशयितांचे रेखाचित्रही प्रसिद्ध केले होते. पकडलेल्या तिघांशी हे रेखाचित्र मिळते जुळते असल्याची चर्चा आहे. अटक केलेल्या तिघांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. उरणमध्ये मुलांना दिसलेल्या बंदुकधा-यांशी तिघांचा संबंध आहे का ? ते पोलिसांनी अजून स्पष्ट केलेले नाही. उरणमधील युईएस शाळेत शिकणारी विद्यार्थीनी गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास शाळकडे येण्यास निघाली. तेव्हा तिने या अतिरेक्यांना पाहिले.
शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती शिराळे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, शाळेकडे येत असताना, नौदल तळापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या बोरी परिसरातील मंदिराजवळ असलेला गेट उघडा दिसल्यामुळे या विद्यार्थीनीचे लक्ष त्याकडे वेधले गेले. मुळात येथे असलेला गेट कोस्टल विभागाला जोडला गेला आहे. तो नेहमी बंद असतो. तिने उत्सुकतेने पुढाकार घेतला तेव्हा, सर्कल करुन उभ्या असलेल्या पाच शस्त्रधारी तरुण तिच्या नजरेत पडले.
काळ्या वेशातील पठाणी कपड्यांमध्ये असलेल्या या तरुणांच्या हातात बंदुक आणि पाठीवर सक होती. ती घाबरलेल्या अवस्थेत शाळेकडे आली. तिने शिक्षकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुलीला घेऊन माझ्याकडे आले. तिच्या माहितीनंतर सातच्या सुमारास आणखीन एका विद्याथ्याने एका शस्त्रधारी इसमाला पाहिल्याचे सांगितले.
भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) उरणमध्ये आहे. शिवाय, नौदलाचे तळही उरणमधील मोराजवळ आहे. ऑईल अँड नॅचरल गॅसचं (ओएनजीसी) प्लांटही उरणमध्ये असून, जीटीपीएस -एमएसईबीचा आशियातील पहिला नैसर्गिक गॅस प्रकल्प उरणमध्येच आहे. यावेळी तरुणांच्या बोलण्यामध्ये पहेले ओनजीसी उडायेंगे उसके बाद स्कूल’ या संभाषणामुळे घाबरलेल्या या विद्यार्थीनी शाळेकडे धाव घेतली. झालेल्या प्रकार शाळेच्या शिक्षिकेला सांगितला. त्यानंतर शाळेने नौदलाकडून याची खातरजमा करुन याबाबत स्थानिक पोलिसांना याची माहिती दिल्याचे शिराळे यांनी दिली.