VIDEO : परभणी जिल्ह्यात शेतक-यांच्या बंदला जोरदार प्रतिसाद
By admin | Published: June 5, 2017 12:42 PM2017-06-05T12:42:09+5:302017-06-05T13:28:45+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला परभणी जिल्ह्यातही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 5 - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला परभणी जिल्ह्यातही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १ जूनपासून राज्यभरात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. परभणी जिल्ह्यात २ जूनपासून या संपाचे तीव्र पडसाद जाणवायला सुरूवात झाली आहे. या आंदोलनांतर्गत ५ जून रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
त्यामध्ये जिल्ह्यातील बहुतांश भागातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. परभणी शहरात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जुन्या मोंढ्यातील भाजीपाल्याचे बीट बंद पाडण्यात आले. येथे सकाळच्या वेळी बीट बंद करण्यास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांशी झालेल्या वादावादातून त्यांना काही व्यापा-यांनी मारहाण केली. यावेळी घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना व्यापा-यांच्या तावडीतून सोडविले.
शहरातील अष्टभूजा देवी मंदिर परिसरातील विक्रेत्यांच्या ताब्यातील भाजी काही शेतक-यांनी रस्त्यावर फेकून दिली. यावेळी येथेही वादाचा प्रकार घडला. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या परिसरात बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी नियुक्त करण्यात आली आहे. शहरातील जनता मार्केट भागातही वादावादीचा प्रकार घडला. शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद आहे.
सेलू शहरातील व्यापा-यांनीही बंद पुकारला असून, शहरात २५ टक्केच भाजीपाल्याची आवक झाली. गंगाखेड तालुक्यातील धारासूर फाटा येथे शेतक-यांनी रस्त्यावर दूध व भाजीपाला फेकून दिला. गंगाखेड येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकून दिला. जिंतूरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
या बंदमध्ये आमदार विजय भांबळे यांनी सहभाग नोंदवला. पाथरीतही व्यापा-यांनी बंद पाळला आहे. मानवतमध्ये सोमवारचा आठवडी बाजार भरलाच नाही. या बाजार परिसरात काही व्यापा-यांनी दुचाकीवरुन फेरी काढून बंदचे आवाहन केले. सोनपेठमध्ये सोमवारी आठवडी बाजार भरला नाही. शहरातील १०० टक्के व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती.
पालममध्येही व्यापारी प्रतिष्ठाने बंद असून, येथे शेतकऱ्यांनी अर्धा तास नांदेड- गंगाखेड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. पूर्णा शहरातही व्यापा-यांनी कडकडीत बंद पाळला असून, रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर रस्त्यावर टायर जाळण्यात आले.