VIDEO- विद्यार्थ्यांचा शाळेसाठी नावेतून जीवघेणा प्रवास
By Admin | Published: August 12, 2016 05:29 PM2016-08-12T17:29:55+5:302016-08-12T19:06:32+5:30
५० हून अधिक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एक हजार फुटांहून अधिक रूंद असलेल्या अडाण नदीपात्रात डोंग्यात बसून जीवघेणा प्रवास करीत आहेत
नरेश आसावा/ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 12 - राहत्या गावात अपुऱ्या शिक्षण सुविधांसह बाहेर गावात जाण्यासाठी मजबूत दळणवळण व्यवस्थेच्या अभावामुळे ५० हून अधिक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एक हजार फुटांहून अधिक रूंद असलेल्या अडाण नदीपात्रात डोंग्यात बसून जीवघेणा प्रवास करीत आहेत. ही भीषण स्थिती आहे वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोळा या पुनर्वसित गावातील.
अडाण नदी ही जिल्ह्यातील मोठ्या नंद्यापैकी एक असून, तिचे पात्र जवळपास एक हजार फुट आहे. आता याच नदीवर वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर मानोरा तालुक्यात १९७२ मध्ये एका भव्य प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आणि या प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहित करताना मानोरा तालुक्यातील म्हसणी, तोरणाळा, घोटी आणि जामदरा, तर कारंजा तालुक्यातील दिघी आणि वाघोळा या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. या गावांचे पुनर्वसन करताना मात्र शासनाने ग्रामस्थांसाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा ४५ वर्षांतही उपलब्ध केल्या नाहीत. परिणामी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करत जीवन जगावे लागत आहे. त्यांना उपलब्ध नसलेल्या मुख्य सुविधांमध्ये दळणवळणाची मजबूत व्यवस्था आणि शिक्षण, आरोग्य या सुविधांचा समावेश आहे. त्यातच वाघोळा गावातील आबालवृद्धांना तर या सुविधांचा अभावामुळे अनेक भीषण समस्यांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पुरेशी आरोग्य आणि शिक्षण सुविधा नसल्यामुळे, पावसाळ्याच्या दिवसांत तर त्यांची परिस्थिती अधिकच भीषण होते. नदीचे पात्र काठोकाठ भरल्यामुळे येथील लोकांना कारंजा किंवा नजिकच्या इंझोरी येथे जाण्यासाठी डोंग्यातून प्रवास करावा लागतो. गर्भवती स्त्रिया आणि विद्यार्थ्यांना यासाठी जीवच धोक्यात घालून वेळोवेळी डोंग्यात बसून जावे लागते. वाघोळा येथील ५७ विद्यार्थी इंझोरी येथे, तर एवढेच कारंजा येथे शिक्षण घेतात.
वाघोळा येथे ८ व्या वर्गापर्यंतचेच शिक्षण असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे किंवा कारंजा येथून येजा करावी लागते. या सर्वांना कारंजा किवा इंझोरी येथे जाण्यासाठी नदीपात्रातून जावे लागते; परंतु हा प्रवास करण्यासाठी नदीवर पुल नाही. त्यामुळे शाळेत जाताना आणि येतानाही डोंग्यात बसून जीव धोक्यात घालून जावे लागते. नाही म्हणायला येथील विद्यार्थ्यांना इंझोरी येथे जाण्यासाठी एक चार किलोमीटर अंतराचा रस्ता आहे; परंतु त्या रस्त्याची अवस्थाही एवढी दयनीय आहे, की थोडाही पाऊस आला की त्या रस्त्यावर चिखल तयार होऊन पायी चालणेही कठीण होते. मग येथून सायकल किंवा ईतर वाहन न्यावे तरी कसे हा प्रश्न निर्माण होतो. पाऊस थांबल्यानंतर रस्ता सुरळीत होण्याची प्रतिक्षा अनेकदा विद्यार्थ्यांना करावी लागते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. अशात शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल आणि शाळेत नियमित जायचे असेल, तर येथील विद्यार्थ्यांना सकाळ, सांयकाळ डोंग्यातूनच जीव धोक्यात घालत प्रवास करावा लागतो. एखादवेळी अनर्थ झाला, तर चिमुकल्यांची मोठ्या प्रमाणात प्राणहानी होण्याची शक्यता आहे.