VIDEO: नाशकात जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना करावा लागतोय प्रवास
By Admin | Published: February 11, 2017 01:58 PM2017-02-11T13:58:28+5:302017-02-11T14:03:20+5:30
राजू ठाकरे/ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 11- शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनातून खाली पडल्याने गुरुवारी (दि.९) चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची ...
राजू ठाकरे/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 11- शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनातून खाली पडल्याने गुरुवारी (दि.९) चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेतून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या एका वाहनाने पेट घेतल्याच्या प्रकारानंतर, आडगाव परीसरात झालेल्या भीषण बस आपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाल्यानंतरही प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुक व्यवस्थेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी केलेली नसल्याचे दिसते. त्यामुळेच विद्यार्थ्यांसोबत असे जिवघेणे अपघात वारंवार होत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
शहरातील विविध खासगी तथा शासकीय शाळांच्या आवारात सकाळी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी शाळेजवळील परिसर व वाहतुक थांबे हे विद्यार्थी व प्रवाश्यांच्या गर्दीने तुडुंब भरलेले असतात. शाळा सुटल्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून जबाबदारी संपल्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाचे. तर रस्त्यावरील थांब्यांवर राज्य परिवहन मंडळानेही विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सोय केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासनतास बसच्या प्रतिक्षेत रस्त्यावरच बसची वाट पाहावी लागते.
{{{{dailymotion_video_id####x844qym}}}}
या परिस्थितीत किमान शहर वाहतूक शाखेने शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्याची गरज आहे. पंरतु, विविध मंत्री महोदयांच्या दौऱ्यांमध्ये चौकाचौकात तासनतास ताटकळत उभे राहणारे वाहतूक शाखेचे कर्मचारी शाळा भरण्याच्या व सूटण्याच्यावेळी शाळेच्या आवारात आता मात्र कुठेही दिसत नाही. त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या तीनचाकी व चारचाकी वाहनातून अनेकदा असुरक्षित आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांचे शहरात पेव फुटले आहे.
अशा वाहनचालकांनी विद्यार्थी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ चालवला असताना प्रशासनाचा या प्रकाराकडे मात्र कानाडोळा होतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासनाने सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करतानांच शहरातील विविध रस्त्यांवर व बस थांब्यांवर सुरक्षा यंत्रणेचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
एसटीमधून होणाऱ्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुकीकडे आरटीओ व शहर वाहतूक विभाग नेहमीच कानाडोळा करतात. शासनाने दुजाभाव न करता सर्वांना समान कायदा लागू करण्याची आवश्यकता आहे. जेणे करून प्रवासी वाहतुकी दरम्यान होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळविता येईल.
- संतोश कपोते,नागरिक
शाळेच्या वेळेत बसथांब्यांवर महिला व मुलींचे छेडछाडीचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहेत.सदर प्रकार रोखण्यासाठी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्यावेळी बसथांब्याच्या परिसरात पोलीसांचा बंदोबस्त ठेवणेही गरजेचे आहे.
- राजेंद्र गवारे ,नागरिक