VIDEO - शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
By Admin | Published: August 23, 2016 04:51 PM2016-08-23T16:51:38+5:302016-08-23T17:08:37+5:30
शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एस.टी.बसमध्ये कोंबून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दाताळा ता.मलकापूर परिसरात दिसून येत आहे
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. २३ : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एस.टी.बसमध्ये कोंबून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दाताळा ता.मलकापूर परिसरात दिसून येत आहे. मात्र शैक्षणिक भविष्य पाहता विद्यार्थी निमूटपणे हा सर्व त्रास सहन करीत आहेत. मलकापूर तालुक्यातील दाताळा परिसरातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याने या परिसरातील दाभाडी, पिंप्री गवळी, चावर्दा, पोफळी, पिंप्री माकोडी, टेंभी, बेलुरा, शेंबा, टाकरखेड, लासुरा व या परिसरातील इतर अशा १२ ते १५ गावातील शेकडो विद्यार्थी दाताळा येथे दररोज शिक्षणासाठी ये-जा करतात. यासाठी विद्यार्थ्यांनी एस.टी.महामंडळाकडे प्रवासभाड्याची रक्कम अग्रीम भरुन पासेस सुध्दा काढल्या आहेत. मात्र नियोजित प्रवासी असताना सुध्दा एस.टी.महामंडळाकडून या विद्यार्थ्यांची बसेसची व्यवस्था करण्यात आली नाही.
या मार्गावर शाळा भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेवर बसफेऱ्या आहेत. मात्र बस मलकापूर येथून निघल्यानंतर आधीच्या थांब्यावरच प्रवाश्यांनी खचाखच भरुन येतात. त्यामुळे दाताळा येथे बसेस आल्यानंतर त्यामध्ये पाय ठेवायला सुध्दा जागा नसते. मात्र अशाही परिस्थितीत घरी जायला उशीरा झाला तर घरचे चिंताग्रस्त होतील यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांना खचाखच भरलेल्या एस.टी.बसमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
प्रवाश्यांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य एस.टी.महामंडळ मिरविते मात्र दुसरीकडे दुसरीकडे विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात न घेता जनावरांपेक्षाही निदर्यतेने जीवघेणी वाहतूक करीत आहे. परिणामी एस.टी.महामंडळाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी न खेळता दाताळा मार्गे मलकापूर तसेच बुलडाणा रस्त्यावर जादा बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी सुध्दा विद्यार्थी पालकवर्गाकडून केल्या जात आहे.