VIDEO : वधुवरानं घेतली ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ची शपथ
By Admin | Published: April 19, 2017 02:48 PM2017-04-19T14:48:54+5:302017-04-19T16:31:24+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 19 - समाजामध्ये आजही मुलामुलींमध्ये भेदभाव करण्याचे प्रकार सुरूच आहेत. वाशीम जिल्हा मुलीच्या जन्मदर प्रमाणात ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 19 - समाजामध्ये आजही मुलामुलींमध्ये भेदभाव करण्याचे प्रकार सुरूच आहेत. वाशीम जिल्हा मुलीच्या जन्मदर प्रमाणात अजूनही मागासलेला आहे. राज्यात वाशीम जिल्ह्यात मुलींच्या प्रमाणात निचांक स्तरावर असल्याने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा संदेश तळागाळात, जनमाणसात नेण्यासाठी या अभियानाचे संयोजक व आयुष विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक ढोके व तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी जिल्ह्यात आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
जिल्हयातील मंगरुळपीर येथील एका लग्न समारंभात वधुवराला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा आठवा फेरा घेण्यास सांगत त्यांना उपस्थितांनाही शपथ देण्याचा उपक्रम पार पाडला. जिल्हयातील मंगरुळपीर येथील सहकार भवन येथे स्वप्नील कतोरे व सौ. स्नेहा यांच्या विवाह प्रसंगी समारंभात 18 एप्रिल रोजी नवदाम्पत्यांनी या उपक्रमांतर्गत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा आठवा फेरा घेवून समाजासमोर आदर्श ठेवला.
यावेळी डॉ. दीपक ढोके यांनी वरवधुसोबत उपस्थित सर्व पाहुणे मंडळींनाही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संकल्प दिला. यावेळी डॉ. ढोके समवेत निलेश सोमाणी, अभियानाच्या विशेष निमंत्रित डॉ.सौ. सरोज बाहेती, बालरोग तज्ञ डॉ. हरिष बाहेती, इंजि. प्रा. किशोर खंडारे, सुनिल गट्टाणी, प्रा. गजानन वाघ, प्रा. हरिभाऊ क्षिरसागर, प्रा. विनायक दुधे, दिलीप देशमुख, प्रमोद पेंढारकर, राधेशाम बलदवा, शशिकांत इंगोले व वधुवरांचे आईवडील उपस्थित होते.
यावेळी नवदाम्पत्यांना या अभियानांतर्गत सन्मान व शपथपत्र देण्यात आले. मुलगी ही दोन्ही घरांना प्रकाश देते. मुलगा वंश आहे तर मुलगी अंश आहे. मुलगा शान तर मुलगी आन आहे. मात्र आजही स्त्री भ्रुणहत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये महिलांचाही सहभाग ही चिंतेची बाब ठरत आहे. अशिक्षितांप्रमाणे सुशिक्षितांमध्येही हे प्रमाण वाढत आहे. मुलगी नकोच ही भावना आज मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याने समाजामध्ये भविष्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आज अनेक समाजात लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याचे वास्तवही निर्माण झाले आहे. भविष्यात भावाला बहीण, पतीला पत्नी मिळणे सुध्दा दुर्मिळ होवू शकते. सदर परिस्थिती बदलण्याकरीता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा नारा देशवासियांना दिला आहे. सरकारी स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अभियान राबवण्यात येत आहे.
केवळ शासन स्तरावर याचा विचार न होता सामाजिक जाणिवेतून डॉ. ढोके व सोमाणी यांनी हे अभियान हाती घेतले असून समाजातील मानसिकता बदलण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. सदर अभियानांतर्गत गावागावात सोबतच आदिवासी भागातही हे अभियान राबवून लेक वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार आहे. लग्न समारंभात वरवधुंनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा आठवा फेरा घेवून या अभियानाला हातभार लावावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात डॉ. हरिष बाहेती यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्वागत केले असून हा उपक्रम काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविकातून निलेश सोमाणी यांनी जिल्हयातील सामाजीक कार्यकर्ते, युवक युवतींनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची शपथ
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचे जिल्हा संयोजक डॉ. दिपक ढोके यांनी वरवधुसमवेत उपस्थित सर्व वर्हाडी मंडळींना अशा प्रकारे शपथ दिली. ‘मी वचनबद्ध आहे मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यास. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यात. मुलगी म्हणजे परक्याचे धन ही मानसिकता बदलण्यास. मुले व मुली मध्ये समानता करण्यासाठी. बालविवाह व हुंडापद्धतीचा प्रखरपणे विरोध करण्यास. मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यास. प्रसुतीपुर्व गर्भनिदान तपासणीचा विरोध करण्यास. स्त्रीभ्रूणहत्येला विरोध करण्यास मी वचनबद्ध आहे.
https://www.dailymotion.com/video/x844vun