VIDEO : जळगावच्या भरीताची चव ‘लय भारी’

By Admin | Published: September 20, 2016 12:01 PM2016-09-20T12:01:35+5:302016-09-20T13:15:18+5:30

कापूस आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याची अस्सल ‘खान्देशी भरीता’ मुळे नवीन ओळख निर्माण होत आहे.

VIDEO: The taste of the heavy weight of Jalgaon | VIDEO : जळगावच्या भरीताची चव ‘लय भारी’

VIDEO : जळगावच्या भरीताची चव ‘लय भारी’

googlenewsNext

विलास बारी, ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २० -  कापूस आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याची अस्सल ‘खान्देशी भरीता’ मुळे नवीन ओळख निर्माण होत आहे. जळगावच्या भरीताच्या वाग्यांना मुंबई, पुणे, इंदौर, नागपूर या भागात मोठी मागणी असल्याने तापी काठच्या अनेक गावांचे अर्थकारण सुरु आहे. हिवाळ्यात तयार होणारे भरीत आता जळगावात वर्षभर तयार होत असून दिवसभरात जळगावातील ३५ ते ४० भरीत सेंटरमधून सुमारे पाचशे किलो भरीताची विक्री होत आहे.

बामणोदच्या वाग्यांना सर्वाधिक पसंती
महाराष्ट्रात खान्देशी भरीत प्रसिद्ध असले तरी जळगावकर मात्र बामणोदच्या वाग्यांना भरीतासाठी पसंती देताता. बामणोद हे भुसावळ-यावल रस्त्यावर लागणारे एक छोटेसे गाव आहे. येथील वांगी मोठ्या प्रमाणात मुंबई-पुण्याला रवाना केली जातात. स्थानिक बाजारात २० ते ३० रुपये किलो दराने मिळणारी ही वांगी मुंबई-पुण्यात १०० ते १५० रुपये किलो दराने विकली जातात. वांग्याची वाढती मागणी लक्षात घेता आता जिल्ह्यातील तापीकाठावरचे सर्वच तालुके ही वांगी पिकवतात. विदर्भातल्या थेट मलकापूरपर्यंत ही वांगी आता सहज उपलब्ध होत आहेत.

लेवा पाटील समाजाचा हातखंडा
जिल्ह्यात लेवा पाटीदार समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. लेवा पाटील समाज बांधवाच्या आहारातील अविभाज्य भाग हा भरीत असतो. या समाजातली पुरुष मंडळी जसे भरीत बनवतात तसे अन्य कोणालाच बनवता येत नाही. त्यामुळे जळगावातील बहुतांश भरीत सेंटर ही लेवा पाटील समाजबांधवांची आहेत.

हिवाळ्यात गावागावात भरीत पार्टी
जळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात गावागावात भरीत पार्टीचे आयोजन केले जाते. खान्देशी भरीताची चव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली. व्यावसायीकांनी ही बाब ओळखत भरीत सेंटर सुरु केले. लग्न समारंभ किंवा अन्य जेवणावळीत भरीत व कळण्याची पुरी या मेनूची चलती सुरु झाली. त्यामुळे जळगावातील जुने बी.जे.मार्केट, बसस्थानक परिसर, भास्कर मार्केट, बजरंग बोगदा या भागात भरीत सेंटर सुरु झाले.


भरीत तयार करण्याची खान्देशी पद्धत
भरीतासाठी सुरूवातीला वांगी भाजावी लागतात. मात्र वांगी भाजण्यापूर्वी त्यांना स्वच्छ काट्याने किंवा सुरीने छिद्रे पाडून घ्यावीत. जळगावात ही वांगी कापसाच्या काड्यांवर भाजतात. त्यामुळे भरीताला चांगली चव येते. वांगी भाजल्यानंतर परातीत ठेवून वांग्यांचा भाजलेला काळा भाग काढला जातो. वांग्यांना भाजल्यानंतर भरपूर तेल सुटते. वांग्यांचा गर एका बडगी (लाकडी भांड्यात) मध्ये टाकला जातो. हा गर लाकडाच्याच मुसळासारख्या वस्तूने ठेचला जातो. एकजीव झालेल्या वांग्याच्या गराला फोडणी दिली जाते. फोडणीत तिखटाऐवजी भाजलेल्या मिरचीचा ठेचा टाकला जातो. त्यासाठी तिखट चवीची लवंगी मिरची वापरली जाते. चवीला तिखट असलेले भरीतच थंडीत रुचकर लागते. कांद्याची पात भरीतासाठी अत्यावश्यक असते. हिरवी पात चिरून तीही भरीतात टाकली जाते आणि त्या पातीचे कांदे जेवताना तोंडी लावायला दिले जातात. खोबरे, शेंगदाणे हे फोडणीच्या वेळी तर ठेचलेला लसूण फोडणी दिल्यानंतर भरीतात टाकला जातो. ज्वारी आणि उडीद यांचे मिश्रण असलेल्या कळण्याची भाकरी किंवा पुरी भरीताची चव अधिक वाढवत असतात.


साधारणपणे हिवाळ्यात भरीत केले जाते. मात्र सद्यस्थितीला जळगावात वर्षभर भरीत तयार करून विक्री केली जाते. जळगावातील वांगे आणि भरीत तयार करण्याची विशिष्ट पद्धत असल्याने पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, इंदौरपर्यंत तयार केलेले भरीत तसेच वांगे पाठविले जातात.
छोटू भोळे, संचालक, कृष्णा भरीत सेंटर, जळगाव.

Web Title: VIDEO: The taste of the heavy weight of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.