Video: ग्रामपंचायतीत बायको सरपंच म्हणून विजयी; निकालानंतर पतीच्या डोळ्यात अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 06:30 PM2023-11-06T18:30:26+5:302023-11-06T18:31:19+5:30
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात रुई नालकोल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल चांगलाच चर्चेत आला.
बीड – राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीला लोकांनी कौल दिल्याचा दावा सत्ताधारी पक्षाने केला आहे. परंतु खोटे आकडे दाखवून भाजपा दिशाभूल करतंय असा आरोप मविआ नेत्यांनी केला. आज ग्रामपंचायत निवडणूक निकालात विजयी उमेदवारांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. कुणी गळ्यात हार घालत, गुलाल उधळतंय, तर कुणाची जेसीबी आणि घोड्यावरून मिरवणूक काढली जातेय. परंतु बीडमधील एका गावात पत्नी सरपंच म्हणून विजयी झाल्यानंतर पती ढसाढसा रडत असल्याचा व्हिडिओ समोर आला.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात रुई नालकोल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल चांगलाच चर्चेत आला. याठिकाणी सरपंचपदी अपक्ष उमेदवार सौ. संध्या नालकोल या विजयी झाल्या. निकालानंतर सरपंच संध्या नालकोल यांचे पती श्रीपती नालकोल जेव्हा कार्यकर्त्यांमध्ये आले त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अपक्ष उमेदवार संध्या श्रीपती नालकोल यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. त्याच मेहनतीचं फळ निकालाच्या माध्यमातून मिळाले. त्यामुळे विजयानंतर विजयी महिला सरपंचाचे पती श्रीपती नालकोल यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांना पाहून कार्यकर्त्यांचे डोळेही पाणावले.
या विजयावर श्रीपती नालकोल म्हणाले की, गावातील गोरगरीब जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला मतदान करून निवडून आणले आहे. त्यांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. माझ्या पॅनेलचे २ सदस्य विजयी झालेत. मी निवडून यावा यासाठी गावातील प्रत्येक महिलांनी महादेवाला नवस केला होता, त्याचसोबत माझ्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारे माझे मित्र, कार्यकर्ते यांच्यामुळे हा विजय साकारला त्यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले आहेत. आता यापुढे मला जी जबाबदारी मिळाली आहे ती व्यवस्थित सांभाळेन असा शब्द त्यांनी दिला.
रुई नालकोल या ग्रामपंचायतीची निवडणूक ही आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली झाली, ही ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठी धोंडे यांनी प्रयत्न केले होते. परंतु गावातील समस्या पाहता श्रीपती नालकोल आणि काही कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आम्ही लढवणार असा निर्धार केला. त्यावेळी निवडून आल्यानंतर आम्ही तुमच्याकडेच येऊ असा शब्द श्रीपती यांनी दिला. त्यावर भीमराव धोंडे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही सरपंच आणि २ सदस्यांना पॅनेलमधून निवडून आणले आहे. येणाऱ्या काळात भीमराव धोंडे यांच्या आशीर्वादाने, नेतृत्वात गावचा विकास करणार आहोत असंही श्रीपती नालकोल यांनी सांगितले.