VIDEO : कारल्याच्या शेतीतून त्यांनी शोधली आर्थिक समृध्दी

By Admin | Published: September 10, 2016 11:29 AM2016-09-10T11:29:49+5:302016-09-10T13:17:23+5:30

धानाची शेती सतत तोट्यात येत असल्याने हिंमत न हरता याच शेतीच्या भरवशावर आर्थिक समृध्दीचा मार्ग देसाईगंज तालुक्यातील अनेक गावातील शेतक-यांनी शोधला

VIDEO: They searched through caravana farming, and they found financial prosperity | VIDEO : कारल्याच्या शेतीतून त्यांनी शोधली आर्थिक समृध्दी

VIDEO : कारल्याच्या शेतीतून त्यांनी शोधली आर्थिक समृध्दी

googlenewsNext
पुरूषोत्तम भागडकर, ऑनलाइन लोकमत
देसाईगंज (गडचिरोली), दि. १० - धानाची शेती सतत तोट्यात येत असल्याने हिंमत न हरता याच शेतीच्या भरवशावर आर्थिक समृध्दीचा मार्ग देसाईगंज तालुक्यातील अनेक गावातील शेतक-यांनी शोधला. हा मार्ग शोधताना त्यांनी भाजीपाला वर्गातील कारल्याची शेती सुरू केली व देसाईगंजच्या ग्रामीण भागातील हे कारले नागपूर मार्ग आता दुबईच्या बाजारपेठेत पोहोचले आहे. कारल्याच्या माध्यमातून या शेतक-यांच्या पदरात मोठा आर्थिक लाभ पडला असल्याने या भागातील २० च्या वर शेतकºयांना कारल्याने अच्छे दिन आणले आहे. 
१९८० च्या वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्प रखडलेले आहे. देसाईगंज हा जिल्ह्याचा जुना तालुका. येथे भंडारा जिल्ह्याच्या इटिया डोह प्रकल्पाचे पाणी काही भागात मिळते. बाकी सर्व भाग पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. अशा विपरित व बिकट परिस्थितीत अनेक वर्षांपासून धानाची शेती करणाºया शेतकºयांच्या शेतीत ‘राम’ उरला नव्हता. कर्जबाजारीपणा, नापिकी, दरवर्षी नैसर्गिक संकट याने पिंजून गेलेल्या शेतकºयांनी भाजीपाला शेतीकडे वळण्याचा निश्चय केला व कारल्याच्या शेतीला पसंती दिली. तालुक्यातील  फरी, एकलपूर, गौरनगर, हरदोली, उसेगाव या भागातील शेतकºयांनी कारले लागवडीला सुरूवात केली. सुरूवातीच्या काळात मालाला व्यापारी मिळत नव्हता. अशा वेळी परिसरातील मोहटोला, किन्हाळा भागात हे कारले विकले जायचे. हळूहळू देसाईगंजच्या रस्त्यावर कारल्यांचा बाजार भरायला सुरूवात झाली. त्यानंतर येथून हळूहळू कारले नागपूरकडे पाठविले जाऊ लागले. त्यानंतर नागपूरच्या व्यापाºयांनी देसाईगंजच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले व कारले उत्पादकांकडे मालाची मागणी वाढली. हळूहळू देसाईगंजच्या बाजारात २०-२० किलो कारल्यांच्या पॉलिथीन बॅग तयार करून पॅकींग होऊ लागल्या व हा माल नागपूर मार्ग दुबईच्या शारजा शहरात थेट जाऊ लागला. त्यामुळे कारले उत्पादक शेतकरी सुखावून गेले. त्यानंतर अनेक शेतकºयांनी कारल्यासोबतच दोडके, वांगे, चवळी, वालफल्ली, मिरची याचेही उत्पादन घेण्यास सुरूवात केली. अजून हा माल सातासमुद्रापार पोहोचला नसला तरी त्यालाही भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा निश्चय या भागातील शेतकºयांनी व्यक्त केला आहे.
 
पिढीजात भाजी लागवडीचे काम
देसाईगंज तालुक्यात माळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. फरीसह अनेक गावातील शेतकरी गेल्या तीन पिढ्यांपासून भाजीपाला पिकाची शेती करतात. अत्यल्प जमिनीतूनही सर्व प्रकारचा शेतमाल घेण्याचे कसब त्यांच्या अंगी आहे. त्यामुळे कारल्याचे उत्पादनही त्यांनी अत्यंत भरपूर प्रमाणात येईल, अशी व्यवस्था केली आहे. यासाठी माती परीक्षण, कृषी विभागाचे मार्गदर्शन करून त्यावर फवारणी आदी बाबी ते करीत असतात. या एकूणच कारला उत्पादनाच्या यशोगाथेबद्दल बोलताना  शिवराजपूरचे शेतकरी सिध्दार्थ शंकर भेंडारे सांगत होते. आमची वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. दीड एकरात कारले, चवळी, वालफल्ली  याचे उत्पादन घेतो. सिंचनाची सोय नाही. फक्त पावसाळ्यातच ही शेती आपण करतो. अर्धा एकरात धान लावतो. जून ते जानेवारी या कालावधीत ७० हजार रूपयांचे उत्पन्न भाजीपाला पिकाच्या भरवशावर काढतो. तर रामचंद्र मोहुर्ले एकूणच भाजीपाला लागवडीबाबत लोकमतशी बोलताना म्हणाले,  माळी समाजाचे असल्याने वडिलोपार्जित धंदा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेताच्या बांधावर पूर्वी तूर लावत होतो. जेमतेम आर्थिक उत्पन्न मिळायचे. आता भाजीपाला पिकाकडे वळल्याने थोडाफार फायदा मिळू लागला आहे.
  
भाजीपाल्यावर भरवशावर सिंचनाची सोय केली
फरी गावचे शेतकरी अभिमन भिवा दिघोरे अभिमानाने सांगत होते. दोन हंगामात भाजीपाल्याची शेती करतो. दीड एकर जागेत बोअरवेल खोदली. शेततळे निर्माण केले. भाजीपाल्यासाठी पाल्याची सोय झाली. त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन वाढले व आमच्या जीवनात आर्थिक समृध्दीचा नवा मार्ग मिळाला

Web Title: VIDEO: They searched through caravana farming, and they found financial prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.