VIDEO- आमगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2016 05:41 PM2016-09-06T17:41:19+5:302016-09-06T17:58:36+5:30
तलासरी तालुक्याच्या आमगाव भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर मंगळवार पहाटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
सुरेश काटे/ऑनलाइन लोकमत
तलासरी दि. 6 - तलासरी तालुक्याच्या आमगाव भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर मंगळवार पहाटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात अडकल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून देखील वरिष्ठ अधिकारी बेफिकीरपणे आरामात घटनास्थळी कोणतेही साहित्य न आणता आले. मात्र आच्छाड वन परिक्षेत्रातील वन कर्मचारी , वन्यजीव एनजीओ डहाणूच्या कार्यकर्त्यांनी बिबट्याला पकडण्यास विशेष मेहनत घेतली.
बछड्यासह फिरणाऱ्या मादी बिबट्याने गेल्या दोन महिन्या पासून आमगाव , डोंगारी भागात धुमाकूळ घालून शेतकऱ्याच्या शेळ्या, बकऱ्या, कोंबडी, कुत्रीही मारून खाल्ली. एवढेच काय या भागातील आदिवासी शेतकरी वसंत इरिम व धनसुख धोडी याच्या वर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. वन खात्याला वारंवार बिबट्याचा बंदोबस्त करण्यास सांगूनही दुर्लक्ष करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना 'लोकमत'च्या वृत्ताने जाग आली. अन् या भागात वन्यजीव संस्था डहाणूच्या मार्गदर्शनाखाली पिंजरे लावले.
पिंजऱ्यात गेल्या पाच दिवसांपासून बकरी, कुत्री ठेवूनही हुलकावणी देणारा बिबट्या आज अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद होताच कार्यरत वन कर्मचारी व गावकरी पिजऱ्या जवळ धावले व पिंजऱ्याला कपड्याने गुंडाळले तो पर्यंत आजूबाजूच्या परिसरातील हजारो लोक बिबट्याला पाहण्यासाठी पिंजऱ्याच्या ठिकाणी धावले.
पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला हे समजूनही वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी आरामात आले पण पिंजरा रस्तावर आणून गाडीत चढविण्या साठी लागणारे साहित्य न आणता हात हलवीत आले परंतु गावकर्यांनी व एनजिओ च्या कार्यकर्त्यांनी साहित्याची जुळवा जुळवी करून वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने पिंजरा जंगलातुन रस्त्यावर आणून गाडीत चढवला
माणसावर हल्ला करणारा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी या मादीचे बछडे व अजून काही बिबट्याचा वावर या भागात असल्याने वन विभागाने या भागात पिंजरे लाऊन ठेवावे अशी मागणी आमगाव भागातील नागरिकांनी केली आहे
उशिरा का होईना जागे झालेल्या वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वसंत इरिम यास एक लाख रुपयाचा मदतीचा धनादेश दिला परंतु गंभीर जखमी वसंत इरिम यास मुंबई येथे हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्या उपचारा साठी अधिक आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले.
गावकऱ्यांनी सावधगिरी म्हणून डोंगर , व जंगल परिसरात जाऊ नये असे आवाहन वन विभागा तर्फे गावकऱ्यांना केले आहे.
धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला लोकांच्या मागणी वरून पिंजरा लावून पकडण्यात आले आहे.
- सोनवणे
वनपरिक्षेत्र अधिकारी