VIDEO : पुरात वाहून गेले ट्रॅक्टर, चौघेजण बचावले
By admin | Published: September 22, 2016 09:11 PM2016-09-22T21:11:58+5:302016-09-22T21:17:01+5:30
पुलावरुन जाणारे ट्रॅक्टर पाण्याचा अंदाज आले नसल्याने वाहून गेले़ ट्रॅक्टरवर बसलेले चौघेही वाहून गेले मात्र, त्यांना पोहता येत असल्याने चौघेही बाहेर आल्याने वाचले आहेत़
ऑनलाइन लोकमत
औराद शहाजानी, दि. २२ : तेरणा व मांजरा नदीस गुरुवारी पुन्हा पूर आला़ त्यामुळे औराद शहाजानी परिसरातील या नद्यांच्या संगमावर पाणी वाढले असून पुलावरुन जाणारे ट्रॅक्टर पाण्याचा अंदाज आले नसल्याने वाहून गेले़ ट्रॅक्टरवर बसलेले चौघेही वाहून गेले मात्र, त्यांना पोहता येत असल्याने चौघेही बाहेर आल्याने वाचले आहेत़
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील शेतकरी दिलीप काशिनाथ कत्ते यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (एमएच २४, डी ५७१६) चालक लक्ष्मण कांबळे गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास वांजरखेड्याहून औराद शहाजानीकडे घेऊन निघाला होता़ ट्रॅक्टरमध्ये मारुती वाघे, सुभाष वाघमारे आणि भरत मेहकरे हे चौघे बसले होते़ दरम्यान, मांजरा- तेरणा नदीच्या संगमावरील पुलावरुन पाणी वाहत होते़ पुराचे पाणी कमी असल्याचे पाहून चालक कांबळे हा ट्रॅक्टर पुढे घेऊन निघाला़ पुलाच्या खोलगट बाजूवर गेला असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ट्रॅक्टर उलटले़ पाणी वाढल्याचे पाहून या चौघांनीही उड्या मारल्या आणि पोहत पाण्याबाहेर पडले़
पाण्याचा विसर्ग वाढल्याने पूऱ़़
औराद शहाजानी परिसरात सलग तिसऱ्याही दिवशी जोरदार पाऊस झाला़ तेरणा नदीवरील किल्लारी, मदनसुरी, लिंबाळा, गुंजरगा, तगरखेडा या उच्चस्तरीय बंधाऱ्याची दारे गुरुवारी सकाळी उघडण्यात आली आहेत़ त्यामुळे तेरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे़ तसेच मसलगा प्रकल्प व धनेगाव बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आल्याने मांजरा नदीसही पूर आला आहे़ या नद्यांवरील हालसी, तुगाव, औराद- वांजरखेडा पुलावर पाणी आल्याने नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे़
शेतकरी अडकला़
तेरणा व मांजरा संगमानजीक औराद शहाजानी येथील रामदास खरटमोल यांची शेती आहे़ ते गुरुवारी शेतात गेले असता अचानक दोन्ही नद्यांना पुर आल्याने ते शेतातच अडकून पडले आहेत़ रात्री उशीरापर्यंत ते शेतातून बाहेर आले नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले़