VIDEO - अकोल्यात अस्वस्थ मराठयांचा ..नि:शब्द जनसागर !
By admin | Published: September 19, 2016 07:03 PM2016-09-19T19:03:00+5:302016-09-19T22:12:20+5:30
रस्त्यांवर लाखोंची गर्दी, महिलांचा लक्षणीय सहभाग, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, कोपर्डी येथील घटनेचा डोळ्यांमध्ये राग, मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्याचा मनामध्ये निर्धार
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १९ : रस्त्यांवर लाखोंची गर्दी, महिलांचा लक्षणीय सहभाग, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, कोपर्डी येथील घटनेचा डोळ्यांमध्ये राग, मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्याचा मनामध्ये निर्धार अन् समाजाने आणखी किती सहन करायचे, अशी अस्वस्थता असलेल्या मराठ्यांच्या जनसागराची लाट अकोल्याच्या रस्त्यावर उसळली; पण कुठेही आवाज नाही, काळजाला हात घालणारी सात लाखांवर मराठ्यांची नि:शब्द शांतता, असे वातावरण मराठा समाज क्रांती मोर्चाच्या निमित्ताने अकोल्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुभवल्या गेले.
मराठवाड्यातील जिल्ह्यानंतर विदर्भातील पहिला मोर्चा सोमवारी अकोल्यात निघाला. या मोर्चाने आतापर्यंतच्या गर्दीचे उच्चांक मोडीत काढले. अकोल्याकडे येणारा प्रत्येक मार्ग हा मोर्चेकरी मराठ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. स्थानिक अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर सकाळी सातवाजेपासूनच मोर्चेकरींची हजेरी सुरू झाली होती. ११ वाजेपावेतो हे मैदान पूर्णपणे भरून गेले. महिलांची उपस्थिती पाहून आयोजकही स्तंभित झाले, उरी येथील लष्करी तळावरील हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी निघालेला हा मोर्चा १ वाजून १० मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी जिल्हाधिकारीे कार्यालय ते अकोला क्रिकेट क्लबचे मैदान या मार्गावर फक्त महिलाच होत्या, या मोर्चात तब्बल तीन लाखांवर महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.
अॅट्रासिटीचा पुनर्विचार करा
अॅट्रासिटी कायद्याच्या दूरूपयोगाबाबत मार्चेकऱ्यांच्या भावना तिव्र होत्या. या कायद्याचा बदलत्या सामाजीक परिस्थितीनुसार पुनर्विचार करावा अशी मागणी मार्चेकऱ्यांनी निवेदनात केली.
जलदगती न्यायप्रक्रिया त्वरीत सुरू करा
कोपर्डी घटनेतील आरोपींवर निर्भया कायद्यानुसार त्वरीत कारवाई करावी तसेच राज्य शासनाने घोषीत केल्याप्रमाणे या प्रकरणाची जलदगती न्यायप्रक्रिया त्वरीत सुरू करण्याची तसेच सहा महिन्याच्या आत सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली
मराठा आरक्षण अन् स्वामिनाथन आयोग
मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी गेल्या २५ वर्षापासुन करण्यात येत आहे मात्र त्याबाबत हलगर्जीपणा होत असल्याने हे आरक्षत तत्काळ जाहिर करून अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागु कराव्यात असे निवेदन शासनाला देण्यात आले.
एकसंघ समाज नेते बेदखल
मोर्चा म्हटला की नेतृत्व कोणाचे हा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो सोमवारी निघालेला मोर्चा मात्र याला अपवाद ठरला. या मोर्चामध्ये समाज एकसंघ होता, नेतृत्व हे समाजाचे होते, मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांचा नेहमीचा वावर लुप्त झालेला होता.
मातृशक्तीला सन्मान देणारा मोर्चा
मराठा समाजाच्या या मोर्चाच्या अग्रभागी महिला होत्या, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलींनी निवेदन वाचून दाखविले, तेच निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. जिजाऊ वंदना करून या मोर्चाने महिला शक्तीलाच वंदन केले.