VIDEO : सांगलीत मराठा क्रांती मोर्चाला अभूतपूर्व गर्दी
By admin | Published: September 27, 2016 10:29 AM2016-09-27T10:29:00+5:302016-09-27T14:09:46+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी अत्याचारातील आरोपींना फाशी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी सांगलीत लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले.
Next
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. २७ - कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, या तीन प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी सांगलीत लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले. मराठा क्रांती मोर्चाद्वारे कृष्णाकाठी उसळलेल्या मराठा महासागरामुळे गर्दीचे यापूर्वीचे जिल्ह्यातील सर्व विक्रम मोडीत निघाले. सांगली, सातारा, कोल्हापूरसह, कर्नाटक, तमिळनाडू, केरळमधील मराठा समाजही मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता.
सांगलीत पहाटे पाचपासूनच मोर्चासाठी लोक जमा होऊ लागले होते. शहरातील सर्व प्रमुख मार्ग बंद करण्यात आले होते. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून सकाळी सव्वाअकराला मोर्चास सुरुवात झाली. हाती भगवे ध्वज, डोक्यावर ‘मराठा मोर्चा’ लिहिलेली भगवी-पांढरी टोपी आणि काळ््या फिती, काळे पोषाख परिधान करून मराठा समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती.
मार्केट यार्ड, पुष्पराज चौकामार्गे हा मोर्चा राम मंदिर चौकात आला. त्यानंतर राम मंदिर चौकातील विचारमंचावर पाच युवतींनी मागण्या व समाजाच्या भावना मांडल्या. युवतींच्या एका गटाने शास्त्री चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर दुपारी एक वाजता मोर्चाचा समारोप झाला.
सांगली-मिरज रस्ता, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, राम मंदिर चौक, काँग्रेस भवन, माधवनगर रस्ता, सांगलीवाडी, कोल्हापूर रस्ता हे प्रमुख मार्ग गर्दीने व्यापले होते. समारोपानंतरही सायंकाळपर्यंत शहरातील वाहतूक व व्यवहार ठप्प होते. सुमारे पाच हजार स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे निर्धारीत वेळेत मोर्चा पार पडला.
क्षणचित्रे
मध्यरात्रीपासूनच पोलिस बंदोबस्त रस्त्यावर तैनात होता.
बाल शिवाजी व जिजाऊंची वेशभूषा करून लहान मुले आंदोलनात सहभागी झाली होती.
हातात भगवे झेंडे घेऊन सहभागी झालेल्या बाल स्केटिंगपटूंनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
‘कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे‘, ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ असे लक्षवेधी फलक घेऊन तरुण मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
शहरातील विविध संस्था, संघटनांच्यावतीने आंदोलकांसाठी पाणी, चहा, अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
हा मूक मोर्चा असल्याने घोषणाबाजीच काय, मोर्चामध्ये एकमेकांशी बोलायचेही नाही, अशा सक्त सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या. त्याचे तंतोतंत पालन आंदोलक करताना दिसत होते.
मोर्चाला जाणा-या गाडीचा अपघात, २ ठार
दरम्यान सांगलीतील आजच्या मोर्चाला जाताना एका इनोव्हा कारचा अपघात होऊन २ जण ठार झाले आहेत. वायफळे (ता. तासगाव) येथून मराठा मोर्चाला जाणाऱ्या इनोव्हा गाडीचा गौरगावजवळ ओव्हरटेक करताना भीषण अपघात झाला. ज्यामध्ये २ जण ठार तर ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.