"त्यांना जिवंतपणी होत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने..."; वडेट्टीवारांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:43 PM2024-09-05T13:43:21+5:302024-09-05T13:51:26+5:30

Vijay Wadettiwar : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. याच दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Video Vijay Wadettiwar slams devendra fadnavis and dharmarao baba atram Over gadchiroli health care | "त्यांना जिवंतपणी होत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने..."; वडेट्टीवारांचं टीकास्त्र

"त्यांना जिवंतपणी होत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने..."; वडेट्टीवारांचं टीकास्त्र

गडचिरोलीमध्ये आजोळी आलेल्या दोन भावडांना ताप आला. अशिक्षित आई- वडिलांनी त्यांना दवाखान्याऐवजी पुजाऱ्याकडे नेले अन् तेथेच घात झाला. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला, पण उशीर झाला होता. अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेने ४ सप्टेंबरला आरोग्यसेवेची विदारक स्थिती उजेडात आली आहे. 

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याच दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले. गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे" असं म्हणत निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला."

"रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले."

"गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे" असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Video Vijay Wadettiwar slams devendra fadnavis and dharmarao baba atram Over gadchiroli health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.