तिकिटासाठी दोन लाखांच्या मागणीचा व्हिडीओ व्हायरल

By admin | Published: February 5, 2017 01:02 PM2017-02-05T13:02:53+5:302017-02-05T13:02:53+5:30

भाजपा अडचणीत, पैशांच्या देवाण-घेवाणीवर शिक्कामोर्तब

The video viral of the demand of two lakh for the ticket | तिकिटासाठी दोन लाखांच्या मागणीचा व्हिडीओ व्हायरल

तिकिटासाठी दोन लाखांच्या मागणीचा व्हिडीओ व्हायरल

Next



नाशिक : पक्षात उमेदवारीसाठी वाढलेल्या इच्छुकांची संख्या लक्षात घेता, भारतीय जनता पक्षाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी देण्यासाठी अक्षरश: बाजार मांडला. पक्षाच्या कार्यालयात बसलेल्या शहर सरचिटणीसाने उमेदवारीसाठी एबी फॉर्म घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांकडे प्रत्येकी दोन लाख रुपयांची मागणी केली व त्याची ध्वनिचित्रफित सोशल माध्यमात व्हायरल झाल्यानंतर भाजपाने याबाबत सारवा सारव सुरू केली.
केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे महापालिका उमेदवारीसाठी इच्छुकांचा मोठा ओढा होता, पक्षीय पदाधिकाऱ्यांबरोबरच सर्वपक्षीय विद्यमान नगरसेवकांनाही भाजपा प्रवेशाचे वेध लागल्याने उमेदवारीसाठी पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू झाली होती. त्यातूनच उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवार निश्चित न होऊ शकल्याने अखेर पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर न करता भाजपाने वैयक्तिक पातळीवर उमेदवारांची भेट घेऊन त्यांना एबी फॉर्मचे वाटप केले, तर काहींना उमेदवारी घेण्यासाठी पक्षाच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. शुक्रवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पक्षाचे सरचिटणीस नाना शिलेदार यांच्यावर उमेदवारांचे नाव, पत्ता व माहिती घेण्याची व पक्षाने निश्चित केलेल्यांना एबी फॉर्म देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार अनेक उमेदवारांनी कार्यालयात धाव घेतल्यावर, उमेदवारी मागणाऱ्यांकडून शिलेदार हे दोन लाख रुपयांची मागणी करीत असल्याची ध्वनीचित्रफित काढण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराकडून पैसे घेतले जात असल्याचा दावा करीत शिलेदार यांनी उमेदवाराकडे दोन लाखांची मागणी तर केलीच, परंतु पैसे नसतील तर बाजूला व्हा, कोणाशी बोलायचे ते बोला असे खडे बोलही इच्छुकाला सुनावल्याचे ध्वनीचित्रफितीत स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षात पैसे घेऊन तिकीट वाटप केले जात असल्याच्या तक्रारीला या ध्वनीचित्रफितीमुळे पुष्टी मिळाली असून, एरव्ही अन्य राजकीय पक्षापेक्षा आपण वेगळे असल्याचे भासविणाऱ्या भाजपाचे ‘वेगळेपण’ यानिमित्ताने जाहीर झाले आहे.
शुक्रवारी रात्रीपासून सोशल मीडियावर भाजपाच्या या दोन लाखांच्या मागणीचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होताच, मोठी खळबळ उडाली.

Web Title: The video viral of the demand of two lakh for the ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.