VIDEO - मराठा महामोर्चाची ‘वॉर रुम’ सज्ज
By admin | Published: September 23, 2016 08:52 PM2016-09-23T20:52:48+5:302016-09-23T20:52:48+5:30
कोणत्याही नेतृत्वाविना एकवटलेल्या मराठा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी येत्या रविवारी निघत असलेल्या महामोर्चासाठी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आखणी सुरु आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २३ - कोणत्याही नेतृत्वाविना एकवटलेल्या मराठा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी येत्या रविवारी निघत असलेल्या महामोर्चासाठी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आखणी सुरु आहे. महामोर्चासाठी मित्रमंडळ चौकातील मॅरेथॉन भवनमध्ये मुख्य कार्यालय तयार करण्यात आले असून या कार्यालयामधून सोशल मिडीयासाठी स्वतंत्र ‘वॉर रुम’ तयार करण्यात आली आहे. सोशल मिडीयाद्वारेही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जात असून आतापर्यंत पाच हजारांंपेक्षा अधिक तरुणांनी मोर्चासाठी स्वयंसेवक म्हणून स्वयंस्फुर्तीने नोंदणी केली आहे.
राज्यभरामध्ये मराठा समाजाचे लाखोंचे रेकॉर्डब्रेक मोर्चे निघत आहेत. कोपर्डीच्या आरोपींना फाशी देण्यासोबतच आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल या प्रमुख मागण्या घेऊन समाजातील अबालवृद्ध, स्त्रिया आणि पुरुष रस्त्यावर उतरत आहेत. या मोर्चांमध्ये महिलांसह महाविद्यालयीन तरुण तरुणींचा सहभाग लक्षणीय आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये यशस्वी मोर्चे झाल्यानंतर आता पुण्यातल्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील मोर्चासाठी चोख नियोजन करण्यात आले.
समाजातील सर्व स्तरातील नागरिक स्वत:हून नियोजनामध्ये सहभागी होत आहे. जिल्ह्यातील गावपातळीपासून ते तालुका आणि जिल्हा पातळीवर कार्यकर्ते व स्वयंसेवकांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. यासोबतच शहरातही विभागनिहाय बैठका झालेल्या आहेत. मोर्चेक-यांना पिण्याच्या पाण्यापासून ते नाश्त्यापर्यंतच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मॅरेथॉन भवनमधील मुख्य कार्यालयात हजारो कार्यकर्त्यांची रीघ लागलेली पहायला मिळत आहे. अनेजणांची अजुनही नाव नोंदणी सुरु आहेत. त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीपासून ओळखपत्र देईपर्यंतचे सर्व सोपस्कार येथे केले जात आहेत. याच कार्यालयामध्ये सोशल मिडीयाचा सदुपयोग करण्यासाठी एक विशेष वॉर रुम तयार करण्यात आलेली आहे. सकाळी सहा ते पहाटे तीनपर्यंत स्वयंसेवक येथे काम करीत आहेत.
सर्वांना व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्वीटर अशा सोशल मिडीयाद्वारे जोडून ठेवणे आणि निरोप देण्याचे काम केले जात आहे. सर्वांना व्हिडीओ, मेसेज, माहिती पाठवण्यात येत आहे. याठिकाणी येणा-या कार्यकर्ते, स्वयंसेवकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.