VIDEO - अशी होते महिलांच्या गळयातील मंगळसूत्राची चोरी
By Admin | Published: January 14, 2017 07:13 PM2017-01-14T19:13:19+5:302017-01-14T19:54:46+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 14 - रेल्वेमधून प्रवास करणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र कटरच्या सहाय्याने लंपास करणा-या टोळीला ...
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - रेल्वेमधून प्रवास करणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र कटरच्या सहाय्याने लंपास करणा-या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरट्यांकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून पोलिसांनी 2 लाख 29 हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांनी दिली.
मौला इब्राहीम शेख (वय 42, रा. केशवनगर, मांजरी रस्ता), गोविंद विठ्ठल गायकवाड (वय 30), गणेश सिद्धराम गायकवाड (वय 30, दोघेही रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वंदना प्रकाश मुलगुंधमध (वय 24, रा. चंदन अपार्टमेंट, अंबरनाथ पुर्व, ठाणे) या चालुक्य एक्सप्रेसमधून 18 ऑक्टोबर रोजी प्रवास करीत होत्या. पहाटे दोनच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरुन गाडी सुटल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले होते. त्याचा तपास सुरु असताना वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांना खब-यामार्फत मौला याची माहिती मिळाली.
त्यानुसार, अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी परिसरामध्ये सापळा लावण्यात आला. त्याला ताब्यात घेऊन तपास करण्यात आला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन गोविंद आणि गणेश या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये रेल्वेतील महिलांच्या गळ्यातील ऐवज कटरच्या सहाय्याने लांबवल्याची कबुली त्यांनी दिली. गर्दीचा तसेच झोपेचा फायदा घेत दागिने चोरण्यात येत होते. पोलिसांनी चार मंगळसूत्र, एक गंठण आणि एक सोनसाखळी हस्तगत केली आहे.
हे सर्व गुन्हे आरोपींनी ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये शिवाजीनगर, पुणे स्टेशन, लोणी आणि हडपसर रेल्वे स्थानकांदरम्यान केले होते. आरोपी गोविंद गायकवाड विरुद्ध पुणे शहरात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, उप अधीक्षक प्रफुल्ल क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक संजय सातव, सहायक निरीक्षक हिम्मत माने पाटील, कर्मचारी भिमा हगवणे, सुनिल कदम, प्रकाश जिराळ, अनिल जुंदरे, बेबी थोरात, झगडे यांच्या पथकाने केली.
गेल्या वर्षभरामध्ये लोहमार्ग पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये उघडकीस येण्याचे प्रमाण तब्बल 66 टक्के आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात जबरी चोरीच्या 15 गुन्ह्यांपैकी 10 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. तर दरोड्याचा एक आणि दरोड्याच्या तयारीचे दोन गुन्हेही उघडकीस आले आहेत.
https://www.dailymotion.com/video/x844oct