VIDEO: लेकीकडे निघालेली महिला खड्ड्यांमुळे पोहोचली रुग्णालयात
By admin | Published: September 3, 2016 08:25 PM2016-09-03T20:25:06+5:302016-09-03T20:26:45+5:30
मोटरसायकलवरुन लेकीकडे निघालेल्या एका महिलेला गोरेगावच्या राम मंदिर रस्त्यावरील खड्डयाने थेट रुग्णालयात पोहीचविले
Next
>- गौरी टेंबकर - कलगुटकर / ऑनलाइन लोकमत
गोरेगाव राम मंदिर रस्त्यावरील खड्ड्याचा प्रताप
मुंबई, दि. 3 - मोटरसायकलवरुन लेकीकडे निघालेल्या एका महिलेला रस्त्यावरील खड्डयाने थेट रुग्णालयात पोहीचविले. हा अपघात शनिवारी सकाळी गोरेगावच्या राम मंदिर रोडवर घडला. मुख्य म्हणजे बारा तासापूर्वीच या मार्गावरून मुख्यमंत्र्यांची गाडी गेली होती. त्यामुळे त्यांना हे खड्डे दिसत नाहीत का ?असा सवाल गोरेगावकरांकडुन विचारला जातोय.
फातिमा शेख (५६) असे या जखमी महिलेचे नाव आहे. ज्या गोरेगावच्या रामनगर परिसरात राहतात. जोगेशवरीच्या मील्लतनगरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी त्या शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा मुलगा मोहम्मद फरहान शेख (२०) याच्या सोबत त्याच्या मोटर सायकलवरुन निघाल्या होत्या. शेख या राम मंदिर रोड आणि एस व्ही रोड जंक्शनकडे पोहोचल्या. त्यावेळी रस्त्यावरील खड्डयामुळे फरहानची मोटरसायकल रस्त्यावर घसरली. ज्यात शेख या रस्त्यावर कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना मिल्लत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्या डोक्याला आठ टाके घालण्यात आले.
गोरेगावचे स्थानीक दीपक जाधव यांनी 'लोकमत' ला दिलेल्या माहितीनुसार, मालाड पुर्व परिसरात उत्तर भारतीयांच्या 'लिठ्ठी चौका' कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन कामगार नेते शरद राव यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच मार्गाने शुक्रवारी आले. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे त्यांच्या दृष्टीस पडले नाही असे होणे शक्य नाही. तसेच याच परिसरात कॅबिनेट उद्योग मत्री,तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि महिला बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर हे बडे नेते देखील राहतात. मात्र रस्त्याची दुरावस्था यातील एकालाही दिसू नये, हीच शोकांतिका असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एकंदरच गोरेगावकरांमध्ये या घटनेनंतर संतापाचे वातावरण पसरले आहे.