VIDEO : जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील जलपातळीत घट
By Admin | Published: August 26, 2016 06:36 PM2016-08-26T18:36:33+5:302016-08-26T18:36:33+5:30
गेल्या चार वर्षापासून पडलेल्या अल्प पावसामुळे येथील जगातील दुस-या क्रमांकाच्या खा-या पाण्याच्या सरोवरातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट आली आहे.
>- मयूर गोलेच्छा/ ऑनलाइन लोकमत
लोणार, दि. 26 - गेल्या चार वर्षापासून पडलेल्या अल्प पावसामुळे येथील जगातील दुस-या क्रमांकाच्या खा-या पाण्याच्या सरोवरातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट आली आहे. परिणामी सरोवराच्या काठावर क्षारयुक्त
पदार्थांचे थर दिसायला लागले आहे.
५ लाख वर्षापूर्वी अश्नीपाताने निर्माण झालेले लोणार येथील खा-या पाण्याच्या सरोवराच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने पाण्यात असलेली सरोवरातील मंदिरे उघडी पडली आहे. ऐन पावसाळ्यात ही स्थिती असल्यामुळे उन्हाळ्यात या सरोवरातील पाणी आटल्याने सरोवराचे अस्तित्व संपेल काय? अशी चिंता संशोधक व्यक्त करीत आहेत. सातत्याने पडणा-या अल्प पावसामुळे भुगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. परिणामी जलसाठे छोटे पडत चालले आहे. लोणारच्या सरोवरातील खा-या पाण्यात अनेक दुर्मीळ जिवाणूंचे अस्तित्व असून, या जैविक संस्था संशोधनाच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असल्याचे मत
वारंवार संशोधकांमधून व्यक्त होत आहे. लोणारच्या सरोवरातील पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षाही खारट आहे.
निसर्ग निमित्त लोणार सरोवराच्या संवर्धनाकरीता केवळ कागदोपत्रीत घोडे नाचवले जात आहे. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सरोवराचा भकासपणा वाढत चालला आहे. परिणामी नेहमी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र राहणा-या लोणार येथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकांनी लोणारकडे पाठ फिरवील्याचे जाणवत आहे. पर्यटकांअभावी शहरातील पर्यटनस्थळे ओस पडू लागली आहे.