Video: दारूच्या दुकानात जाणा-यांच्या गळ्यात पुष्पमाळा
By Admin | Published: May 22, 2017 08:27 PM2017-05-22T20:27:30+5:302017-05-22T20:27:30+5:30
ऑनलाइन लोकमत धाड (बुलडाणा), दि. 22 - गावातील देशी दारूचे दुकान बाहेर काढण्यासाठी येथील महिलांनी प्रशासनाला निवेदन देवून कारवाईची ...
ऑनलाइन लोकमत
धाड (बुलडाणा), दि. 22 - गावातील देशी दारूचे दुकान बाहेर काढण्यासाठी येथील महिलांनी प्रशासनाला निवेदन देवून कारवाईची मागणी केली मात्र अद्याप प्रशासनाने याबाबत कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे येथील महिलांनी चक्क दारूच्या दुकानासमोर गांधीगिरी करून देशी दारूच्या दुकानात जाणा-या व येणा-या मद्यपींच्या गळ्यात पुष्पमाळा घालून स्वागत केले.
गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुख्य मार्गापासून ५०० मीटर अंतरावील दोन देशी दारूचे दुकान बंद झाली. मात्र, गावातील एक दुकान मात्र सुरू आहे. परिणामी या ठिकाणी दारू पिणा-यांची संख्या वाढल्याने येथे प्रमाणाबाहेर गर्दी होत आहे. याचा सर्वाधिक त्रास गावातील महिलांना, वृध्द नागरिकांना व मुलांना होत आहे. यासंदर्भात गावातील ३०० पेक्षा जास्त महिलांनी १ मे रोजी ग्रामसभेत आग्रही मागणी करत दारूचे दुकान हे गावाबाहेर हटवण्याचा ग्रामसभेचा ठराव घेतला. तसेच
जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देवून १५ दिवसाची मुदत दिली. मात्र आजपर्यंत यावर कुठलीच कारवाई न झाल्याने अखेर धाड येथील महिलांनी सायंकाळी ६.३० वाजता देशी दारूच्या दुकानासमोर जमून दारू पिण्यास येणा-या तळीरामांचा पुष्पहार घालून गांधीगिरी करत स्वागत केले. यावेळी लक्ष्मीबाई मोहिते, प्रिया दिपक मालवे, नलीनी कृष्णा जोशी, विद्या बबन जोशी, माधुरी पळसोकर, वैदही पळसोकर, दिपाली खडके यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. महिलांच्या या अभिनव आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात झाली.
पाहा व्हिडीओ-
https://www.dailymotion.com/video/x844zd0