VIDEO- पोलीस स्टेशनमध्ये भरते तरुणांची शाळा !
By Admin | Published: February 8, 2017 07:13 PM2017-02-08T19:13:34+5:302017-02-08T19:13:34+5:30
ऑनलाइन लोकमत/गणेश मापारी मूर्तिजापूर, दि. 8 - पोलीस भरतीसोबतच सैन्यदल, नौदल, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस आदी भरती प्रक्रियेसाठी ग्रामीण भागातील ...
ऑनलाइन लोकमत/गणेश मापारी
मूर्तिजापूर, दि. 8 - पोलीस भरतीसोबतच सैन्यदल, नौदल, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस आदी भरती प्रक्रियेसाठी ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना तयार करण्याचे काम मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी हाती घेतले आहे. यासाठी आठवड्यात दोन दिवस युवकांची शाळा पोलीस स्टेशनच्या आवारातच भरविली जात असून, ग्रामीण भागातील युवकांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींनी पोलीस दलासोबतच इतर भरतींसाठी सक्षम व्हावे, यासाठी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी युवक-युवतींची भरतीपूर्व सराव परीक्षा घेण्याचे नियोजन केले. गत तीन आठवड्यापासून सुरू केलेल्या या उपक्रमाला ग्रामीण भागातील युवक-युवतींचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सराव परीक्षेसाठी पोलीस स्टेशनमध्ये भरविण्यात येणाऱ्या शाळेत युवकांची संख्या वाढत चालली आहे. विशेष म्हणजे सराव परीक्षेसोबतच मैदानावरील चाचण्यांबाबतही युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मंगळवारी ६५ युवकांनी हजेरी लावली असून त्यांच्याकडून भूगोल या विषयाची सराव परीक्षा घेण्यात आली. यानंतर अंतगणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास करवून नंतर युवकांची सराव परीक्षा घेतली जाणार आहे.
लेखन सामग्री, नोट्स मोफत
ग्रामीण भागातील तरुण बेरोजगार राहिल्याने वाईट मार्गाला लागतात. त्यामुळे त्यांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. विशेष म्हणजे सराव परीक्षेच्या तयारीसाठी लागणाऱ्या विविध विषयाच्या नोट्स तसेच लेखन सामग्रीही मोफत दिली जात असल्याने ठाणेदारांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींचा पोलीस दलातील टक्का वाढावा, त्यांना भरती प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठीच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम सुरू केला आहे. दिवसेदिवस युवकांचा प्रतिसाद वाढत असल्याने समाधान मिळत आहे.
नितीन पाटील
सहायक पोलीस निरीक्षक,
पोलीस स्टेशन, मूर्तिजापूर (ग्रामीण)