विधानपरिषद निवडणूक होणार, विजयासाठी घोडेबाजार अटळ; लढतीत रंगत अन् चुरसही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 09:05 AM2024-07-06T09:05:51+5:302024-07-06T09:06:48+5:30
पळवापळवी रोखण्यासाठी पुन्हा पंचतारांकित प्रयोग, ११ जागांसाठी १२ उमेदवार कायम
मुंबई - विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. प्रमुख १२ उमेदवारांपैकी कोणीही मुदतीअखेर उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने घोडेबाजार अटळ दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच प्रमुख पक्षांची सत्त्वपरीक्षा या निमित्ताने होणार आहे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १२ जुलैला ही रंगतदार निवडणूक होईल. प्रमुख पक्षांच्या मतांची फाटाफूट अटळ दिसत आहे. आता ही मते नेमकी कोणत्या पक्षाची फुटतील, कोणाला गळाला लावले जाईल या संदर्भातील हालचालींना लगेच वेग येणार आहे. दगाफटका होऊ नये म्हणून सगळेच पक्ष अलर्ट मोडवर असतील. आपापल्या आमदारांना मुंबईतील किंवा बाहेरच्या पंचतारांकित हॉटेलांमध्येही ठेवले जाऊ शकते.
कोण आहेत उमेदवार?
भाजप : पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे.
काँग्रेस : प्रज्ञा सातव
शिंदेसेना : भावना गवळी, कृपाल तुमाने शेकाप : जयंत पाटील
अजित पवार गट : राजेश विटेकर,
शिवाजी गर्जे
उद्धवसेना : मिलिंद नार्वेकर
कुणाला बसेल धक्का?
२०२२ मध्ये राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले व त्यातूनच शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरे सरकार गेले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. यावेळी धक्कादायक निकाल लागण्याची पूर्ण शक्यता असली तरी नेमका धक्का कोणाला बसणार याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
माघारीसाठी झाल्याच नाहीत हालचाली...
एका उमेदवाराच्या माघारीसाठी फारशा हालचाली शुक्रवारी झाल्या नाहीत. अजित पवार अर्थसंकल्प चर्चेला दोन तास उत्तर देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्याचवेळी निवडणूक अटळ असल्याचे स्पष्ट झाले.
सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला
उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटस्थ, त्यांचे स्वीय सचिव असलेले मिलिंद नार्वेकर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना निवडून आणणे ही ठाकरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बाब असेल. शेकापचे नेते जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाटील यांचे जिंकणे हे पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेचे असेल. शरद पवार यांनी म्हटले असले तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही असे अजित पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपला पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी तीन मतांची गरज असेल. लहान पक्षांची गरज भासेल. अपक्ष व लहान पक्षांसोबतच दुसऱ्या पसंतीच्या मतांनादेखील महत्त्व असेल.