"मी शिवसैनिक, बोललो ते बोललो..."; आईवरून शिवीगाळ केल्याचं अंबादास दानवेंकडून समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 11:55 AM2024-07-02T11:55:08+5:302024-07-02T12:21:50+5:30
विधान परिषदेत शिवीगाळ केल्याचं उघडपणे समर्थन करत अंबादास दानवेंनी भाजपावर निशाणा साधला.
मुंबई - समोरच्याचं काहीही सहन करणार नाही, मी शिवसैनिक, त्याच बाण्यानं उत्तर दिलं असं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या शिवीगाळीचं समर्थन केले आहे. अंबादास दानवे यांनी ज्या भाषेचा प्रयोग केला त्यामुळे मला रात्रभर झोप आली नाही असं विधान आमदार प्रसाद लाड यांनी केले. त्यावरही अंबादास दानवेंनी टोला लगावला.
अंबादास दानवे म्हणाले की, भाजपानं नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही. भाजपानं ज्या राहुल गांधींना संसदेतून निलंबित केले, १५० खासदारांना निलंबित केले होते. त्यांनी संसदीय भाषा, नियम, कायदे हे मला, उद्धवजींनी शिकवण्याची गरज नाही. तो राजकारणात नवीन आहे, त्याने बिनधास्त झोपायला पाहिजे होते, आम्ही बिनधास्त झोपलो. जिथे जिथे जायचं तिथे जावं. त्यांना जे काही करायचे ते करू द्या. आता त्यांना कायदे आठवायला लागलेत. इतके दिवस कायदे त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते. आता कायदे नियमांची जाणीव झाली हे चांगले असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय मी शिवसैनिक आहे. शिवसैनिकाच्या बाण्यानं उत्तर दिलं. समोरच्याचे काहीही सहन करणार नाही. मी बोललो ते बोललो, पळपुटा थोडी आहे. हिंदुत्व वैगेरे प्रसाद लाड यांच्यासारखे बाटगे लोक शिकवतात, जे धंद्यापाण्यासाठी जिथे सत्ता आहे तिथे घुसतात. तसं आम्ही नाही. हे लोक आम्हाला हिंदुत्व काय शिकवणार, हिंदुत्वासाठी काय काय करावं लागते आणि याआधी काय केले हे त्यांना माहिती नाही. मी सभापतींशी बोलत होतो. सभागृहात सभापतींसमोर बोलले पाहिजे. माझ्याकडे हातवारे, अंगविक्षेप करण्याची गरज नव्हती. विरोधी पक्षनेता हा आक्रमकच असला पाहिजे असंही अंबादास दानवेंनी म्हटलं.
सभागृहात काय घडलं?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आणलेल्या राहुल गांधी यांच्या निषेधाच्या प्रस्तावाला आक्षेप घेताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जीभ घसरली आणि सभागृहाच्या परंपरेचा चिंधड्या उडाल्या. आपल्या जागेवरून बाहेर येत दानवे यांनी लाड यांना थेट शिवीच हासडल्याने झालेल्या हमरीतुमरीत सभागृहातली चर्चा की गल्लीबोळातले भांडण याचे भानही सदस्यांना राहिले नाही.
प्रसाद लाड काय म्हणाले?
सभागृहामध्ये अंबादास दानवे यांनी मला आई बहिणीवरुन शिव्या दिल्या. या सुसंस्कृत महाराष्ट्राला परवडणाऱ्या नव्हत्या. माझी आई २५ वर्षापू्र्वी कर्करोगाने वारली आणि तिच्याबद्दल अपशब्द काढणे हे विरोधी पक्षनेत्याला किती योग्य वाटते याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत विचारणा केली आहे का हा प्रश्न देखील मला विचारायचा आहे. या सगळ्या प्रकारानंतर मी किती शूर आहे, माझ्याकडे बोट दाखवलं तर बोट कापेन असे म्हणतात. या सगळ्या प्रकारावर मला भाष्य करायचे नाही. आम्ही देखील परळ, लालबागसारख्या जिथे शिवसेनेचा उगम झाला तिथे मोठे झाले आहोत. सुसंस्कृत असल्यामुळे उत्तराला उत्तर देणार नाही. पण या घटनेमनुळे रात्रभर झोपू शकलो नाही. ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या आईवरुन शिव्या दिल्या त्या माझ्या मनाला दुःख देऊन गेल्या आहेत असं प्रसाद लाड यांनी म्हटलं.