शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार?; आज होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 06:33 AM2024-07-04T06:33:36+5:302024-07-04T06:34:58+5:30

निलंबन मागे घेण्याची उद्धवसेनेची मागणी, उपसभापतींना दानवेंनीही दिले पत्र

Vidhan Parishad: Ambadas Danve Suspension period wiil reduce in Abuse Case, The decision will be made today | शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार?; आज होणार निर्णय

शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार?; आज होणार निर्णय

मुंबई - भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी पाच दिवसांसाठी निलंबित केलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निलंबन कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी बुधवारी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना निलंबन मागे घेण्याबाबत निवेदन दिले.   

दानवे यांच्या वक्तव्यावर उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. दुसरीकडे दानवे यांनीही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना पत्र पाठवून विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकरी, श्रमिक आणि इतर घटकांचे प्रश्न मांडण्यासाठी निलंबन मागे घेण्याची विनंती केली. 

१० मिनिटे आमदारांची वेलमध्ये बसले

प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार अनिल परब यांनी निलंबन मागे घेण्यासंदर्भातील निवेदन मांडले. सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब करून यावर निर्णय घ्या, तोपर्यंत सभागृहात खाली बसून कामकाजात भाग घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली. उद्धवसेनेचे सचिन अहिर, विलास पोतनीस, काँग्रेसचे सतेज पाटील, अभिजित वंजारी, राजेश राठोड, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, अरुण लाड आदी आमदार वेलमध्ये बसले. 

विरोधकांचे दबावतंत्र

विरोधक दबावतंत्र वापरत आहेत. संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि संबंधितांसह चर्चा करून निलंबनाचा कालावधी कमी करण्याबाबत विचार करू, अशी ग्वाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. त्यानंतर झालेल्या बैठकीत दानवे यांचे निलंबन रद्द करण्याऐवजी कालावधी कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते.

वंजारी आणि दरेकर यांच्यात खडाजंगी

अर्थसंकल्पावरील चर्चेत काँग्रेस सदस्य अभिजित वंजारी यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विषयी असंसदीय शब्द वापरला, अशी तक्रार भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली. दरेकर आणि वंजारी यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक झाली; परंतु अनिल परब यांनी मध्यस्थी करत, वंजारी यांच्या भाषणात असंसदीय शब्द असल्यास कामकाजातून वगळावे, अशी विनंती केली.

 

Web Title: Vidhan Parishad: Ambadas Danve Suspension period wiil reduce in Abuse Case, The decision will be made today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.