Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, सतेज पाटील यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 02:33 PM2021-11-09T14:33:09+5:302021-11-09T14:34:01+5:30
Vidhan Parishad Election 2021: या निवडणुकीमध्ये आता राज्यातील महाविकास आघाडी एकत्र लढणार की सर्व पक्ष वेगवेगळे लढणार याबाबत उत्सुकता आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान आणि 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
विधान परिषदेच्या एकूण 8 जागांचा कार्यकाळ संपुष्ठात येत असला तरी सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीमध्ये आता राज्यातील महाविकास आघाडी एकत्र लढणार की सर्व पक्ष वेगवेगळे लढणार याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वी काँग्रेसने अनेकवेळा स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे प्रत्येक पक्ष आपआपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक मोठी चुरशीची होणार हे निश्चित आहे.
निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना जाहीर : 16 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याचा दिनाक: 23 नोव्हेंबर
अर्जांची छाननी: 24 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत: 26 नोव्हेंबर
मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4)
मतमोजणी : 14 डिसेंबर
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक: 16 नोव्हेंबर