Sadabhau Khot: सहाव्या जागेसाठी सदाभाऊंनी दाखल केला अर्ज, चंद्रकांत पाटील म्हणाले- 'आमचा त्यांना पाठिंबा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 02:12 PM2022-06-09T14:12:43+5:302022-06-09T14:13:00+5:30
Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना भाजपने जाहीर समर्थन दिले आहे.
मुंबई- राज्यसभेनंतर आता राज्यातील विधानपरिषद निवडणुकांमध्येही चुरस वाढली आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठीही ऐनवेळी सहावा उमेदवार देत महाविकासआघाडी सरकारसमोर आव्हान निर्माण केले आहे. या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना भाजपने जाहीर समर्थन दिले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
'सहा उमेदवार निवडून येणार'
विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने खेळी खेळल्याचे चित्र आहे. सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपचा पाठिंबा आहे. त्यांना भाजपकडून पूर्ण समर्थन मिळेल. भाजपचे पाच आणि अपक्ष एक असे आमचे सहा उमेदवार निवडून येतील', असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
'सदाभाऊ शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय'
पाटील पुढे म्हणाले की, 'सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले नेते आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक लढे उभे केले आहेत, शेतकऱ्यांसाठी त्यांचे काम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना आमदार मतदान करतील', असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सदाभाऊंचा उमेदवारी अर्ज दाखल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळी खोत यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्याआधीच सदाभाऊ खोत विधानभवनात पोहोचले आणि त्यांनी उमा खापरे यांच्यासोबत विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला. खोत यांना सहाव्या जागेसाठी मैदानात उतरवून भाजपने लढत कडवी केली आहे.