Vidhan Parishad Election: 'त्यांनी' शब्द दिला म्हणून पाचवा उमेदवार उभा केला; भाजपानं स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 03:04 PM2022-06-20T15:04:11+5:302022-06-20T15:05:34+5:30
मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षांना आपापलं पाहून घ्या हे विधान केले जेव्हा संकट येते, पराभव दिसतो तेव्हा असं विधान येते.
मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात काँग्रेस-भाजपाच्या उमेदवारामध्ये थेट लढत आहे. राज्यसभेत भाजपाला १० मते जास्त मिळाल्याने निकालात भाजपाचा तिसरा उमेदवारही निवडून आला. त्यानंतर विधान परिषदेत भाजपाने पाचवा उमेदवार उभा करून महाविकास आघाडीला आव्हान दिले.
या निवडणुकीबाबत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीतही आमचाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास महाविकास आघाडीचे नेत्यांनी व्यक्त केला होता. राज्यसभेत आम्हाला अपक्ष आणि घटक पक्षांची मते मिळाली. या सरकारला राज्यसभेत जसा धक्का दिला तसा धक्का विधान परिषदेत देण्याची आमची इच्छा आहे असं त्यांनी सांगितले. त्यामुळे सहकार्याच्या आणि शब्दावर आम्ही भाजपाचा पाचवा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे भाजपा ही निवडणूक जिंकेल असा विश्वास आहे असं ते म्हणाले.
तसेच भारतीय जनता पार्टीचा आमदार, कार्यकर्ता कधीही पक्षाच्या धोरणाविरोधात वागत नाही. करत नाही. एकनाथ खडसे यांनी ४० वर्ष भाजपात काम केले आहे. त्यामुळे त्यांचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. परंतु या संबंधातून मतदान होईल हे भाजपाच्या आमदारांकडून असं होणार नाही असं सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंना भाजपाची काही मते पडतील का या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षांना आपापलं पाहून घ्या हे विधान केले जेव्हा संकट येते, पराभव दिसतो तेव्हा असं विधान येते. त्यांच्यावर किती संकट आणि भीती आहे ते दिसून आले. नाराजीचा फायदा घेऊन आम्ही सत्तेत यावं हा आमचा भ्रम नाही आणि विचारही नाही. फक्त नाराजीतून सरकारने बोध घ्यावा. जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना दारू संबंधात निर्णय घेणे हा चुकीचा भ्रम काढला पाहिजे. सरकारनं माज, अहंकार बाजूला ठेवावा असा टोला मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.