Eknath Khadse: "भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण..."; एकनाथ खडसेंचं ऐन मतदानादिवशी मोठं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:10 AM2022-06-20T10:10:50+5:302022-06-20T10:11:57+5:30
राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा उमेदवारांमध्ये चढाओढ या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
मुंबई-
राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा उमेदवारांमध्ये चढाओढ या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. दहाव्यासाठी अतिरिक्त उमेदवार रिंगण्यात असल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. यात नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. भाजपाचे माजी नेते आणि सद्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी ऐन मतदानादिवशी मोठं विधान केलं आहे.
विधान परिषद निवडणुकीचे LIVE UPDATES पाहण्यासाठी क्लिक करा
"भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. पण पक्षाला सोडून मला मतदान करतील अशी परिस्थिती नाही", असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. ते विधान भवनाकडे रवाना होताना प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे काही आमदार तुम्हाला मतदान करणार असल्याचं बोललं जात आहे असं एकनाथ खडसे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचं मान्य केलं. पण ते भाजपासोडून मला मतदान करणार नाहीत असंही खडसेंनी यावेळी स्पष्ट केलं.
"राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीला फटका बसला होता. पण यावेळी तसं होणार नाही. सर्व तयारी व्यवस्थित केली गेली आहे आणि प्रत्येक आमदार त्यांना देण्यात आलेल्या पक्षाच्या आदेशानुसारच मतदान करेल. भाजपाचे अनेक आमदारांशी माझे चांगले संबंध आहेत. ते संपर्कात आहेत ही गोष्ट जरी खरी असली तरी ते पक्षाला सोडून मला मतदान करतील अशी परिस्थिती सध्या नाही", असं एकनाथ खडसे म्हणाले. खडसे यांनी यावेळी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला.