लातूर-बीड-उस्मानाबादेतही 'लक्ष्मीदर्शन' चमत्कार...शंभराने मागे असलेली भाजपा 76 मतांनी विजयी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 08:34 AM2018-06-12T08:34:13+5:302018-06-12T13:29:11+5:30
भाजपाने मिळवला अशक्यप्राय विजय; धनंजय मुंडेंना मोठा झटका
उस्मानाबाद: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील द्वंद्वामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत मंगळवारी भाजपाने बाजी मारली. भाजपाचे सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव केला. या विजयामुळे धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे या विजयामुळे पंकजा यांची भाजपातील पत आणखी वाढली आहे. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते 'लक्ष्मीदर्शना'च्या जोरावरच भाजपाला हा चमत्कार साध्य झाला.
या निवडणुकीत १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपाकडे जवळपास 100 मते कमी होती. मात्र, तरीही मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच सुरेश धस यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत आणखी वाढवत नेली. त्यांना एकूण 526 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना 451 मते मिळाली. याशिवाय, 25 मते तांत्रिक कारणामुळे बाद ठरवण्यात आली. याशिवाय, एकाने मतदाराने नोटासाठी मतदान केले. हा निकाल पाहता यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची बरीच मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या भावा-बहिणीतील राजकीय द्वंद्वामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक असणारे रमेश कराड यांना राष्ट्रवादीच्या गोटात दाखल करून धनंजय मुंडे यांनी भाजपावर कुरघोडी केली होती. मात्र, ऐनवेळी रमेश कराड यांना निवडणुकीचा अर्ज मागे घ्यायला लावून पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने धनंजय मुंडे यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत रंगली होती. अखेर या लढतीत पंकजा यांनी बाजी मारून धनंजय यांना चांगलाच झटका दिला.
ठळक घडामोडी:
10.38 या निवडणुकीत १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता . यापैकी 526 मते सुरेश धस यांना तर जगदाळेंना 452 मते मिळाली. तर 25 मते बाद ठरवण्यात आली. याशिवाय, एका मतदाराने नोटासाठी मतदान केले.
10.29 अशोक जगदाळे यांच्याकडून फेरमोजणीची मागणी
10.16 भाजपाचे सुरेश धस विजयी, राष्ट्रवादीला मोठा धक्का
10.14 थोड्याचवेळात बाजूला ठेवण्यात आलेल्या संशयास्पद मतांची मोजणी करणार
10.13 सर्व टेबलांवरील मतमोजणी संपली; भाजपाचे सुरेश धस आघाडीवर
10.01 प्राथमिक कल : 5 टेबलवरुन मतमोजणी; 3 टेबलवर आघाडी पुरस्कृत अशोक जगदाळे तर 2 टेबलवर भाजपचे सुरेश धस पुढे, मात्र मते एकत्र केल्यास अटीतटीचा सामना
8.55 10 ते 10.30 पर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता
8.50 पाच टेबलवरून एकाच फेरीत होणार मतमोजणी, 10 वादग्रस्त मते अन्य मतपत्रिकांत मिसळण्यात आली.
8.40 मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात, मतपेट्यांचे सील काढून सर्व मतपत्रिका एकत्र करण्याचे काम सुरू
8.00. तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात