Vidhan Parishad Election: सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे; विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:04 PM2022-06-13T15:04:02+5:302022-06-13T15:06:24+5:30
सदाभाऊ खोत विधान भवनात दाखल झाले. त्यामुळे खोत माघार घेणार अशी चर्चा झाली.
मुंबई - राज्यसभेच्या निकालात भारतीय जनता पार्टीने ३ जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली. अपक्ष आणि छोट्या मित्रपक्षांची मते फुटल्याने भाजपाला यश मिळेल. मात्र राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. भाजपाने या निवडणुकीत पक्षाचे ५ तर अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांना उभे केले होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी प्रत्येकी २ उमेदवार उभे आहेत.
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राजकीय हालचाली वाढल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, महाविकास आघाडीकडे मते जास्त आहेत. भारतीय जनता पार्टीकडे ४ निवडून येतील एवढी मते आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने केली जात आहे. तर काँग्रेसनं त्यांचा उमेदवार मागे घ्यावा मग बिनविरोध निवडणुकीबाबत विचार केला जाईल असं भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी सांगितले होतं.
त्याचवेळी सदाभाऊ खोत विधान भवनात दाखल झाले. त्यामुळे खोत माघार घेणार अशी चर्चा झाली. परंतु माध्यमांशी बोलताना खोत म्हणाले होते की, भाजपाने ६ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आजही आम्ही ठाम आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक होणार आहे. या निवडणुकीत १० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी विधान परिषदेच्या निवडणुकीत उफाळून येईल. मोठ्या संख्येने भाजपाकडे मते वळाल्याची दिसतील असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे. राज्यसभेत जो चमत्कार घडला तोच विधान परिषदेत होईल. आमदारांना घोडे म्हणणं हा त्यांचा अपमान आहे ज्यांनी त्यांना घोडे म्हणलं त्यांना घोडा लागेल. मला अद्याप कुठलाही निरोप आलेला नाही. काँग्रेसनं जागा मागे घ्यावी की नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे असं सांगितले. मात्र अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे येत्या २० जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुका होणार त्यासाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.