विधान परिषद निवडणूक: मविआ की भाजपा, दहावी जागा कुणाच्या खिशात? आज घमासान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 07:02 AM2022-06-20T07:02:03+5:302022-06-20T07:17:37+5:30

Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक सोमवारी होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे.

Vidhan Parishad Election: Tenth seat in whose pocket, BJP of MVA? Election today | विधान परिषद निवडणूक: मविआ की भाजपा, दहावी जागा कुणाच्या खिशात? आज घमासान

विधान परिषद निवडणूक: मविआ की भाजपा, दहावी जागा कुणाच्या खिशात? आज घमासान

googlenewsNext

 मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक सोमवारी होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. ‘शेरास सव्वाशेर मिळतोच’ असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत राज्यसभा निवडणुकीचा बदला यावेळी घेणार असे जणू आव्हानच दिले आहे.

आषाढी वारीला सोमवारी सुरुवात होत आहे. विधान परिषदेच्या वारीत विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता आहे. रविवार असूनही राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला होता. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या आघाडीच्या नेत्यांनी फोनवरून चर्चा केली. दरम्यान, फोर सीझन हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रात्री उशिरा काँग्रेसचे नेते व आमदारांशी चर्चा  केली.

देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात जाऊन मार्गदर्शन केले. ‘चिंता करू नका, आपल्याला विजय सोपा नसला तरी अशक्यप्राय काहीही नाही’ या शब्दांत विश्वास व्यक्त केला.  अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना काळजीपूर्वक मतदान करण्याचा सल्ला दिला. 

प्रसाद लाड विरुद्ध भाई जगताप सामना
- काँग्रेसला दुसरी जागेसाठी किमान ८ मते हवी आहेत. भाजपला स्वत:चे संख्याबळ व सोबतचे अपक्ष मिळून ११२ एवढे संख्याबळ असल्याने पाचवी जागा निवडून आणण्यासाठी तब्बल १८ मतांची गरज आहे. 
- लहान पक्ष, अपक्षांशिवाय आघाडीतील काही मते गुप्त मतदानाचा फायदा घेत फोडण्यावर भाजपचा भर आहे. भाजपमध्ये आमचे संबंध आहेत हे लक्षात ठेवा, असा इशारा देत राष्ट्रवादीने भाजपचीही काही मते फुटू शकतात असे सूचित केले आहे. भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप असा दहाव्या जागेसाठीचा सामना आहे. भाजपचे आमदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला तर उद्या काय ते दिसेलच असे भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
- राज्यसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. त्यातील काही अपक्ष व लहान पक्षांचे आमदार यावेळी महाविकास आघाडीसोबत असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. 

भाजपचे आमदार मला मत देणार नाहीत : खडसे
भाजपमध्ये दोनच नाहीत तर बरेच आमदार माझे समर्थक आहेत पण, ते मला मतदान करतील असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. 

 कोण कोण सोबत? 
- संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार, श्यामसुंदर शिंदे या तीन अपक्ष आमदारांनी शिवसेनेला मत दिले नाही असा आरोप शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी केला होता. हे तिन्ही आमदार उद्याच्या 
निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आहेत. समाजवादी पार्टीदेखील महाविकास आघाडीसोबत आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने अद्यापही पत्ते उघडलेले नाहीत. 
- दोन आमदार असलेल्या एमआयएमने भूमिका जाहीर केलेली नाही पण, मी एकनाथ खडसे यांना मत देणार असे या पक्षाचे आमदार फारुख शहा म्हणाले.
- मतदानाला सोमवारी सकाळी ९ वाजता विधानभवनात सुरुवात होईल. रात्री ८ पर्यंत निकाल अपेक्षित आहे.

यांच्या भाग्याचा फैसला
शिवसेना -     
सचिन अहीर,
    आमशा पाडवी 
भाजप   -   प्रवीण दरेकर, राम शिंदे,
    श्रीकांत भारतीय,
    उमा खापरे, प्रसाद लाड 
राष्ट्रवादी   -   रामराजे नाईक निंबाळकर,
    एकनाथ खडसे 
काँग्रेस- चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप 

Web Title: Vidhan Parishad Election: Tenth seat in whose pocket, BJP of MVA? Election today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.