विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; असे आहे मतांचे गणित, शिवसेना अन् काँग्रेसच सेफ...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 10:10 AM2024-07-12T10:10:06+5:302024-07-12T10:12:01+5:30
Vidhan Parishad Election Updates: विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. यानंतर सायंकाळी निकाल येणार आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. कोणाचे आमदार फुटणार, कोणाचे क्रॉस व्होटिंग करणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या असून आतापर्यंत भाजपासह इतर पक्षांच्या ३५ आमदारांनी मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार हॉटेलवरून विधान भवनाकडे निघाले आहेत. तर अजित पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदारही वाटेवर आहेत.
विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. यानंतर सायंकाळी निकाल येणार आहे. भाजपाचे आमदार कुलाब्याच्या ताज प्रेसिडन्सीमध्ये तर शिवसेनेचे बांद्राच्या ताज लँड्समध्ये, उद्धव ठाकरेंचे परळच्या आयटीसी ग्रँड मराठा आणि अजित पवार गटाचे अंधेरीच्या ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. सुरुवातीच्या सत्रात भाजपाचे आमदार मतदान करणार आहेत. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार मतदान करणार आहेत. मते फुटू नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
दरम्यान, नवाब मलिक देखील विधानभवनात पोहोचले आहेत. मलिकांनी काल शरद पवार गटाच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यांनी शरद पवार, जयंत पाटलांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. यामुळे मलिक अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करतात की शरद पवारांच्या याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हे आहेत रिंगणात
भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर
शिंदेसेना : भावना गवळी, कृपाल तुमाने
अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस : प्रज्ञा सातव
उद्धवसेना : मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील
मतांचे गणित काय...
भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडतात.
शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे ३९ आमदार असून त्यांना १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने ते सुस्थितीत आहेत.
शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वत:च्या पक्षाचे एकच आमदार आहेत. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांचे १५ आमदार आहेत. याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे १६ मते आहेत. त्यांना आणखी सात मतांची जुळवाजुळव करावी लागेल.
अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्यांना आणखी सात मते लागतील. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचे गणित जुळेल, असे म्हटले जात आहे.
उद्धवसेनेकडे १५ आमदार आहेत, त्यांना आणखी ८ मते लागतील. एक अपक्ष त्यांच्यासोबत आहेत.
काँग्रेसची मते या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची आहेत. त्यांच्याकडे ३७ मते आहेत आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ २३ मते लागतील. याचा अर्थ काँग्रेसकडे १४ मते अतिरिक्त आहेत, ती कुठे वळतात यावर बरेच अवलंबून असेल.