विधान परिषद निवडणूक: भाजपा, राष्ट्रवादीने राखल्या, सेनेने मिळवल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:02 AM2018-05-25T00:02:19+5:302018-05-25T00:02:19+5:30
वैयक्तिक संबंध मतांची फाटाफूट व लक्ष्मीदर्शन यांमुळे काहीसे वेगळे चित्र निकालांत पाहायला मिळाले.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या सहा पैकी पाच निवडणुकांचे निकाल गुरुवारी लागले. हे निकाल अनपेक्षित म्हणता येतील, असे नव्हते. पण वैयक्तिक संबंध मतांची फाटाफूट व लक्ष्मीदर्शन यांमुळे काहीसे वेगळे चित्र निकालांत पाहायला मिळाले. भाजपा सोबत नसताना शिवसेनेने दोन जागा मिळवल्या आणि भाजपा व राष्ट्रवादीने आपले गड कायम राखले. काँग्रेसच्या वाट्याला अर्थातच भोपळा आला, हे या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. लातूर-उस्मानाबादचा निकाल काय लागतो, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निकालांचे हे मतदारसंघनिहाय विश्लेषण.
कमळाच्या साथीने अनिकेत तटकरे विजयी
रत्नागिरी : शिवसेनेवर नाराज असलेल्या भाजपने केलेल्या मदतीमुळे राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांना तब्बल ३१४ मतांनी पराभूत केले. एकूण ९३८ मतांपैकी ६२0 मते तटकरे यांना तर ३0६ मते शिवसेनेचे राजीव साबळे यांना मिळाली. १२ मते बाद झाली. ३१४ मतांच्या आघाडीने तटकरे यांनी जागा कायम राखली.
विधान परिषदेसाठी शिवसेना आणि भाजपने युती केली होती. काँग्रेस, स्वाभीमान व शेकाप यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. कागदावर युतीची मते अधिक होती. मात्र पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसमोर उमेदवार उभा केल्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी होती व भाजपची मते राष्ट्रवादीला जाणार असल्याची चर्चा होती. या निवडणुकीत शिवसेनेची मते कायम राहिली असून, उर्वरित सर्वच मते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याचे स्पष्ट होते. इथे शिवसेनेची ३0३ मते होती तर भाजपची १६४ मते होती. मात्र प्रत्यक्षात शिवसेना उमेदवार साबळे यांना ३0६ मतेच मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्वत:ची मते १७४ इतकीच आहेत. उर्वरित ४४६ मते त्यांना इतरांच्या पाठिंब्यामुळे मिळाली आहेत. स्वाभिमान पक्षाचा वाटाही महत्त्वाचा आहे. खासदार नारायण राणे यांनी निवडणुकीआधीच अनिकेत तटकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता.
काकांनंतर पुतण्या
या मतदार संघात आधी अनिल तटकरे विजयी झाले होते. आता त्यांचा पुतण्या अनिकेत सुनील तटकरे विजयी झाले. त्यामुळे हा मतदार संघ काकांकडून पुतण्याकडे गेला आहे.