Vidhan Parishad Result: विधान परिषदेचा पहिला निकाल हाती; एकनाथ खडसेंसह हे उमेदवार विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 09:19 PM2022-06-20T21:19:56+5:302022-06-20T21:20:19+5:30
विधान भवनात सेंट्रल हॉलमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यावेळी सर्वच पक्षाचे बहुतांश आमदार याठिकाणी बसले होते.
मुंबई - राज्यसभेच्या निकालानंतर विधान परिषदेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. विधान परिषदेत निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसनं भाजपाच्या २ आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतला. परंतु हा आक्षेप फेटाळल्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली. या मतमोजणी छाननीमध्ये २८५ मते वैध ठरवण्यात आली आहे.
विधान भवनात सेंट्रल हॉलमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यावेळी सर्वच पक्षाचे बहुतांश आमदार याठिकाणी बसले होते. या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होते. या निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेनेचे सचिन आहिर, आमश्या पाडवी, भाजपाचे प्रविण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी झाले आहेत.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपाने ५ उमेदवार उभे केले होते. तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत पाहायला मिळत होती. परंतु महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीलाही दुसऱ्या उमेदवारांचा मतांचा कोटा पूर्ण करण्यास ४-५ मतांची गरज होती. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते.
काँग्रेसचा आक्षेप, मतमोजणीला विलंब
विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान झाले. एकूण २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनी मतदान केले. तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांना हायकोर्टाने मतदानाची परवानगी नाकारली तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसनं भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. जगताप, मुक्ता टिळक यांनी मदतनीसाच्या माध्यमातून हे मत दिले असा आक्षेप काँग्रेसनं घेतला. त्यासाठी काँग्रेसनं राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे विधान परिषदेच्या मतमोजणीला विलंब झाला.
निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळला
भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील याची खात्री आहे असा दावा भाजपा नेते करत होते. काँग्रेसचे आक्षेप राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवत मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश दिले. सुकृतदर्शनी आक्षेप योग्य नसल्याने मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असेल असं भाजपाचे आमदार राहूल नार्वेकर यांनी सांगितलं.