ही सोंगटी कुणाची?... भाजपानं राज ठाकरेंना डिवचलं; विधानसभेचं बिगुल वाजताच 'कार्टुन' काढलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 04:11 PM2019-09-21T16:11:53+5:302019-09-21T16:23:46+5:30
राज ठाकरे 2004 च्या निवडणुकीवेळी शिवसेनेत होते. मात्र, त्यांच्या पसंतीचे उमेदवार कमी देण्यात आले होते. यानंतर राज यांनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली होती.
मुंबई : शिवसेनेपासून राज ठाकरेंनी 2006 मध्ये वेगळे होत मनसे पक्ष काढला. तेव्हाच्या पहिल्या 2009 च्या निवडणुकीत मनसे वेगळा लढला होता. यावेळी मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. मात्र, 2014 च्या निवडणुकीला केवळ एकच आमदार आला होता. तर 2019 ची लोकसभा निवडणूकच मनसेने लढविली नव्हती. यामुळे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता येती विधानसभा मनसे लढविणाऱ असल्याच्या पार्श्वभुमीवर भाजपाने व्य़ंगचित्रकार असलेल्या राज ठाकरेंवर 'मार्मिक' शरसंधान साधले आहे.
राज ठाकरे 2004 च्या निवडणुकीवेळी शिवसेनेत होते. मात्र, त्यांच्या पसंतीचे उमेदवार कमी देण्यात आले होते. यानंतर राज यांनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली होती. यानंतरच्या निवडणुका मनसे एकट्याने लढत होती. 2009 मध्ये मनसेचे 288 पैकी 13 आमदार निवडून आले होते. मुंबई, कल्याणच्या महापालिकेतही चांगले यश मिळाले होते. यामुळे शिवसेनेला मनसेचा मोठा फटका बसत होता. मात्र, राज ठाकरे यांची बदलती भुमिका पक्षाला मारक ठरत गेली.
2014 मध्ये लोकसभेला राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दिली होती. मात्र, लोकसभा निवडणूकही लढविली होती. या दुटप्पी भुमिकेमुळे मनसेला खासदार निवडून आणता आला नाही. 2014 मध्ये विधानसभेला मनसेचा तर एकच आमदार निवडून आला. तोपर्यंत मनसेच्या नेत्यांनी रामराम करत शिवसेना, भाजपाचा रस्ता धरला होता. यानंतर 2019 मध्ये लोकसभेला मनसेने निवडणूक न लढविण्याचीच भुमिका घेतली. आणि यावेळी त्यांनी 2014 च्या उलट मोदींना विरोध केला होता.
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंनी थेटपणे काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली होती. भाजपा विरोधातील मतांचे ध्रुवीकरण भाजपाच्या पथ्यावर पडेल, या कारणामुळे राज यांनी हा निर्णय घेतला होता. एकही उमेदवार उभा नसताना राज ठाकरेंनी सभा घेतल्या होत्या. यामुळे त्यांच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात टाकायचा असा प्रश्नही निवडणूक आयोगाला पडला होता. अशा दर निवडणुकीला भुमिका बदलण्याच्या राज ठाकरे यांच्या स्वभावाचा भाजपाने समाचार घेतला आहे.
भाजपाने 2004 पासून 2019 च्या लोकसभेपर्यंतच्या राज ठाकरेंच्या बदलत्या भुमिकांचा 'राजमान्य' खेळ व्यंगचित्रातून मांडला आहे. तसेच प्रत्येक निवडणुकीत वेगळी घरे खेळणारी सोंगटी (राज ठाकरे) विधानसभेला कोणाच्या घरात जाणार असा प्रश्न विचारला आहे.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार??
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 21, 2019
शेवटी जनतेच्या मनोरंजनाचा प्रश्न आहे...!! pic.twitter.com/w3jg22M7Uv
ईडीने केलेली कोहिनूर मिल प्रकरणाची चौकशी आणि राज ठाकरेंवर भाजपने साधलेले शरसंधान यामुळे येत्या निवडणुकीला चांगली धार चढणार असल्याची चिन्हे आहेत.