Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीतील वाढ ही वेतनवाढ, जमीन दरवाढीमुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 05:05 AM2019-10-06T05:05:58+5:302019-10-06T05:10:03+5:30
मुख्यमंत्र्यांकडे २०१४ मध्ये ५० हजार रुपये रोख रक्कम होती.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये जी संपत्ती वाढली ती केवळ वेतनवाढ आणि जमिनीचे बाजारमूल्य वाढल्याने झाली अन्यथा गेल्या पाच वर्षांत त्यांनी जास्तीची कोणतीही संपत्ती जमविलेली नसल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.
फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूरमधून उमेदवारी अर्ज सादर करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली स्थावर मालमत्ता ३.७८ कोटी रुपये इतकी नमूद केली आहे. २०१४ मध्ये हीच स्थावर मालमत्ता १.८१ कोटी रु. होती. प्रामुख्याने जमिनींच्या बाजारमूल्यात गेल्या पाच वर्षा$ंत झालेल्या वाढीमुळे स्थावर मालमत्तेत वाढ झाली आहे. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य २०१४ मधील ४२.६० लाख रुपयांवरून आता २०१९ मध्ये ९९.०३ लाख रुपये झाले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे २०१४ मध्ये ५० हजार रुपये रोख रक्कम होती. ती आता १७,५०० रुपये आहे. बँकेतील ठेवी २०१४ मध्ये १ लाख १९६३० रु. इतक्या होत्या. आता त्या ८ लाख २९,६६५ रु. झाल्या आहेत. आमदार म्हणून त्यांना जे वेतन मिळते ते वाढल्याने ही वाढीव रक्कम दिसते. अमृता फडणवीस यांच्याकडे २०१४ मध्ये रोख रक्कम २० हजार रु. होती, ती आता १२,५०० रु.आहे. बँकेत ठेवी १ लाख ८८१ रु. होत्या. आता त्या ३ लाख ३७,०२५ रु.आहेत. त्यांच्याही वेतनात गेल्या पाच वर्षांत झालेल्या वाढीचा हा परिणाम आहे. त्यांच्या २०१४ मधील १.६६ कोटी रुपयांच्या शेअर्सचे मूल्य आता २.३३ कोटी रु. इतके झाले आहे.