Vidhan Sabha 2019: भाजपा-शिवसेनेत चार मतदारसंघांच्या वादावर चर्चा सुरूच!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 06:53 AM2019-10-01T06:53:19+5:302019-10-01T06:53:49+5:30
भाजप-शिवसेनेत कोण किती व कोणत्या जागा लढणार, याची घोषणा न करताच महायुतीची घोषणा सोमवारी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पत्रकाद्वारे केली.
मुंबई : भाजप-शिवसेनेत कोण किती व कोणत्या जागा लढणार, याची घोषणा न करताच महायुतीची घोषणा सोमवारी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पत्रकाद्वारे केली. यानंतर, आम्ही प्रचंड यश संपादन करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात व्यक्त केला.
चार जागांसाठी भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळेच आज ज्या पत्रकाद्वारे युती झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यात कोण, कोणत्या व किती जागा लढणार हे लवकरच जाहीर केले जाईल, असे म्हटले आहे. म्हणजेच जागावाटपाबाबत दोन पक्षांत एकमत नाही.
ज्या जागांवर एकमत आहे, त्यांचे ए/बी फॉर्म देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी सुरू केले. ते आजही सुरू होते. भाजपने ए/बी फॉर्म विभागीय संघटकांकडे सुपुर्द केले असून, त्यांचे वाटप सुरू उद्या होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून महायुतीचा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्रिपद सेनेला देण्याचे ठरलेले नाही
उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याचे ठरलेले नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आदित्य ठाकरे वरळीमधून स्वत:च्या उमेदवारीची घोषणा करताना, मी ही निवडणूक केवळ आमदार वा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नसून जनसेवेसाठी लढत आहे, असे म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत यांंनी आदित्य यांचे कौतुक करताना भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरू शकले नसले, तरी आमचे हे सूर्ययान (आदित्य) मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर (मुख्यमंत्री कार्यालय), नक्कीच पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. या संदर्भातील प्रश्नावर चंद्रकात पाटील म्हणाले की, महत्त्वाकांक्षा असणे काही गैर नाही. ते जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. प्रत्येक पक्षाला आपला नेता सर्वोच्च पदी जावा, असे वाटतंच असते.
युतीत बंडाचे निशाण फडकू लागले : शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप जोरात सुरू आहे. त्यातून आपल्या हातातून जागा जात असल्याचे भाजपच्या एकेका इच्छुकांना स्पष्ट होत आहे. त्यामुळे काही नेत्यांकडून बंडाचे निशाण फडकवणे सुरू झाले आहे. या बंडखोरीच्या भीतीने भाजपच्या यादीला विलंब होत आहे. शिवसेनेतीले विद्यमान आमदार तसेच २०१४ मधील उमेदवारांचा पत्ता कापला गेल्याचे लक्षात आल्याने त्या मतदारसंघातही उद्रेक सुरु झाला आहे.
जिथे सहमत, तिथे फॉर्मवाटप
वादातील जागांवर चर्चा सुरू ठेवायची आणि एकमत झालेल्या जागांवर आपापल्या उमदेवारांना ए/बी फॉर्मचे वाटप करायचे, असे भाजप-शिवसेनेने ठरविले आहे. युतीची घोषणा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत होते, पण आज ती घोषणा पत्रकाद्वारे करण्यात आली. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस सायंकाळपर्यंत मुंबईतच नंतर फडणवीस यांनी नागपुरात विजयाचा विश्वास व्यक्त केला.