राठोड यांच्या उमेदवारीने संग्राम जगतापांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 12:19 PM2019-10-02T12:19:26+5:302019-10-02T12:19:40+5:30
आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणावर पहायला मिळत होते.
मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याची चर्चा पहायला मिळत होती. मात्र नगर मतदारसंघातून शिवसेनेकडून अनिल राठोड यांना पक्षाच्या उमेदवारीचा एबी फॉर्म मिळाला असून त्यांना अधिकृतरीत्या पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे राठोड यांच्या उमेदवारीने संग्राम जगतापांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणावर पहायला मिळत होते. त्यातच मधल्या काळात संग्राम जगताप यांच्या सगळ्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे चिन्ह असलेले ‘घड्याळ’ गायब झाल्याने जगताप हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याचे बोलले जात होते. मात्र राष्ट्रवादी पक्षाला सोडणार नसल्याचा दावा वेळोवेळी जगताप यांच्याकडून करण्यात आला होता.
तर शिवसेनेकडून मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत नगर मतदारसंघातून अनिल राठोड यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सहाजिकच जगताप यांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहेत. तर दुसरीकडे जगताप हे आता राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे.
गेल्यावेळी सुद्धा मुख्य लढत जगताप आणि राठोड यांच्यात पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे पुन्हा या दोन्ही नेत्यांमध्येचं यावेळी लढत होणार आहे. मात्र २०१४ ला भाजप,शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी चारही पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने, मतांचे विभाजन झाले आणि जगताप यांना विजय मिळवता आला होता. मात्र यावेळी भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असल्याने नगर मतदारसंघातील लढत चुरशीची ठरणार आहे.