Vidhan Sabha 2019: पक्ष आंबेडकरी, अन् हाती कमळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 12:31 AM2019-10-06T00:31:03+5:302019-10-06T00:31:28+5:30

रामदास यांनी स्वत:च्या पक्षाचे अस्तित्वच मिटवून टाकले आहे.

Vidhan Sabha 2019: Party Ambedkar, and lotus in hand! | Vidhan Sabha 2019: पक्ष आंबेडकरी, अन् हाती कमळ!

Vidhan Sabha 2019: पक्ष आंबेडकरी, अन् हाती कमळ!

Next

- संजीव साबडे 

नामांतराच्या लढ्यात सहभागी असलेले, रिपब्लिकन ऐक्यासाठी एके काळी प्रयत्न करणारे रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सोडून भाजप-शिवसेना युतीत प्रवेश केला, याला आता पाच वर्षे झाली. पण त्यांनी आतापर्यंत स्वत:च्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले होते. आघाडी असो वा युती, त्यांचे उमेदवार स्वत:च्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावरच लढले. तरीही त्यांचे उमेदवार कायमच पराभूत झाले. पण रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे स्वतंत्र अस्तित्व आठवले यांनी कायमच ठेवले. आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, असे ते सतत सांगत होते. या रामदास आठवलेंनी आता अचानक भाजपचे कमळच हाती घेतले आहे. त्यांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांचे विजयी झालेले उमेदवार कायदेशीर भाजपचेच असतील. त्यांना भाजपचा व्हिप पाळावा लागेल. प्रसंगी रिपब्लिकन पक्षाने भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेतली तरी या आमदारांना मात्र विधानसभेत भाजपच्या भूमिकेनुसारच वागावे लागेल, मतदान करावे लागेल.

रामदास यांनी स्वत:च्या पक्षाचे अस्तित्वच मिटवून टाकले आहे. त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उघडपणे भाजपचा जयजयकार करावा लागेल, भाजपचा झेंडा हातात मिरवावा लागेल आणि भाजपच्या कमळ या चिन्हावर शिक्का मारा, असे मतदारांना सांगावे लागेल. भाजप व कायम हिंदू राष्ट्राची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही... ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यावर माझा विश्वास नाही आणि मी कधीही त्यांची पूजा करणार नाही’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आठवले व त्यांच्या अनुयायांना निवडणुका जिंकण्यासाठी कमळ हाती घेताना डॉ. आंबेडकर यांच्या या विचारांचा विसर पडला की त्यांना आता त्या विचारांचे देणेघेणे राहिले नाही?

निवडणुका येतात आणि जातात. रिपब्लिकन पक्षांच्या विविध गटांना कधीच निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळाले नाही. पण एक विशिष्ट विचार घेऊ न पुढे जाणारा पक्ष म्हणून या गटांची गणना होत असे. मराठवाडा, विदर्भ, नाशिक, कोकण अशा प्रकारे रिपब्लिकन नेत्यांनी पक्षाची शकले करून दाखवली. इतके गट झाले की ते स्वबळावर कधीच निवडून येणार नाही, अशी अवस्था झाली. या गटांचा वापर काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता पार्टी, जनता दल या सर्वांनी वेळोवेळी करून घेतला. नेत्यांना सत्तास्थाने दिली. त्यावर नेते खूश आणि नेत्यांमार्फंत आपल्याला काही तरी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असे. तरीही या गटांचे वेगळेपण कायम राहिले. कवाडे, गवई, आंबेडकर, खोब्रागडे, दाणी, गाणार, कांबळे असे असंख्य गट आंबेडकरी जनतेने पाहिले. पण त्यांच्या हाती काहीच आले नाही, तर प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाचा अप्रत्यक्ष फायदाही भाजपलाच होत आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असे आवाहन आपल्या बांधवांना केले. रा. स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातच त्यांनी लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. पण त्यांचे अनुयायी त्यांची संघटित व्हा ही शिकवणही विसरून चालले आहेत आणि संघर्षाऐवजी सत्ताच त्यांना महत्त्वाची झाली आहे. यापेक्षा मायावती चांगल्या. त्यांनी बाबासाहेबांचा विचार सांगून उत्तर प्रदेशातील सत्ता मिळवून दाखवली. त्यांनी भाजपशी अशी जवळीक कधी केली नाही. आता आठवलेंना आंबेडकरी विचारांचे पाईक म्हणावे का, असा प्रश्न त्यांनी काही अनुयायांना तरी पडला असेल.

Web Title: Vidhan Sabha 2019: Party Ambedkar, and lotus in hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.