Vidhan sabha 2019 : रामदास आठवलेंची रिपाइं कमळ चिन्हावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:05 AM2019-10-03T05:05:04+5:302019-10-03T05:05:26+5:30
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपल्बिकन पक्षाला महायुतीमध्ये सहा जागा देण्यात आल्या आहेत. आठवले यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपल्बिकन पक्षाला महायुतीमध्ये सहा जागा देण्यात आल्या आहेत. आठवले यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
या सहा जागांमध्ये पाथरी (जि.परभणी), नायगाव (जि.नांदेड), फलटण (जि.सातारा), मानखुर्द शिवाजीनगर (मुंबई), माळशिरस (जि.सोलापूर) आणि भंडाराचा समावेश आहे. सहापैकी चार जागांवरील उमेदवारही आठवले यांनी जाहीर केले. माळशिरसमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सांगतील तो उमेदवार रिपाइं देणार आहे.
आठवले यांनी सांगितले की, आम्हाला केंद्रात एक मंत्रीपद, राज्यसभेची एक अधिकची जागा, राज्यात एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रीपद व विधान परिषदेच्या दोन जागा, महामंडळांची तीन अध्यक्षपदं, प्रत्येक महामंडळात एक सदस्य व प्रत्येक जिल्ह्यात १०० एसईओ पदे देण्याचा प्रस्ताव आम्ही भाजपला दिलेला आहे.
निवडणूक चिन्हाचा फायदा व्हावा म्हणून आमचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतील. आमच्या पक्षाला कॉम्प्युटर हे चिन्ह मिळाले आहे पण ते मतदारांमध्ये परिचित नाही. त्यामुळे कमळावर लढायचे पण पक्षाचे अस्तित्व व आमदारांचा गट टिकवायचा असा निर्णय घेतला आहे.
- रामदास आठवले, राष्ट्रीय अध्यक्ष, रिपाइं
या चौघांना उमेदवारी
शिवाजीनगरमधून रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे उमेदवार असतील. फलटणमधून मुंबईतील पक्षाचे नेते दीपक निकाळजे तर पाथरीतून मोहन फड यांना व नायगाव (जि.नांदेड) येथे राजेश पवार यांना उमेदवारी देण्यात
आली आहे.
मानखुर्दवरून वाद
मानखुर्दमध्ये शिवसेनेने माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना
या आधीच एबी फॉर्मचे वाटप केलेले आहे.